पिंपरी : सोने तारण कर्जाची अधिक रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक केली. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खेड तालुक्यातील मेदनकरवाडी चाकण येथे २०१८ ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
संजय तुळशीराम लांडगे (वय ५०) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. २१ मार्च) चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. माणिक देवराम राऊत, विशाल माणिक राऊत, कुणाल माने आणि दोन संशयित महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भादंवि कलम ४०६, ४२०, ३४ प्रमाणे याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी संगणमत करून अधिक सोने तारण कर्जाची रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाशवून फिर्यादी यांच्याकडून ९६.१ ग्रॅम सोने घेतले. त्यापैकी २३ ग्रॅम सोने स्वत:कडे ठेवून घेतले. सोने तारण कर्ज फिर्यादी संजय लांडगे यांच्या नावाने न काढता सोने हे संशयित विशाल याने त्याचे स्वत:चे असे भासवले. फिर्यादी संजय लांडगे यांना फसवून त्यांचे सोने बळकावण्याच्या हेतूने विशाल याने स्वत:च्या नावावर चार लाख ५० हजार रुपये सोने तारण कर्ज काढले. तसेच फिर्यादी संजय लांडगे यांना उसने दिलेल्या पैशापौटी पाच टक्के व्याज घेऊन संजय लांडगे यांची फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक अभिजित चौगुले तपास करीत आहेत.