पिंपरी : ‘वर्ल्ड वाईड ॲग्रो बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने यूट्युब चॅनलवरून प्रसिद्धी करून घरबसल्या व्यवसाय आणि मासिक कमाईचे आमिष दाखवून नागरिकांची १८ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली. वाकड येथील शंकर कलाटे नगरमध्ये मे २०२४ ते २१ जुलै २०२५ या कालावधीत ही घटना घडली.
या प्रकरणी महिलेने सोमवारी (दि. २१ जुलै) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सुशांत सुभाष पाटील (४०), संशयित एक महिला (३८), अभय देवा (४०, तिघे रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली), मनदीपसिंग (३८, रा. काळेवाडी) आणि संशयित एक महिला (३०, रा. चिंचवडगाव) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी वर्ल्ड वाईड ॲग्रो बिझनेस या नावाने यूट्युब चॅनलवर प्रसिद्धी केली. त्यांनी घरबसल्या व्यवसाय आणि मासिक कमाईचे आमिष दाखवून नागरिकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले. त्या आश्वासनांना भुलून फिर्यादी आणि इतर लोकांनी संशयितांकडे १८ लाख सहा हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता संशयितांनी फसवणूक केली.