निगडी गावठाणात चौरंगी लढत
By Admin | Updated: February 14, 2017 02:07 IST2017-02-14T02:07:28+5:302017-02-14T02:07:28+5:30
निगडी गावठाण प्रभागात विविध जागांतून पाच विद्यमान नगरसेवक रिंगणात आहेत. ‘क’ जागेसाठी तीन विद्यमान नगरसेविकांसह

निगडी गावठाणात चौरंगी लढत
पिंपरी : निगडी गावठाण प्रभागात विविध जागांतून पाच विद्यमान नगरसेवक रिंगणात आहेत. ‘क’ जागेसाठी तीन विद्यमान नगरसेविकांसह माजी स्थायी समिती सभापती एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे या जागेसाठी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
प्रभाग १३ क्रमांकमध्ये निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक २२, ओटा स्कीम, यमुनानगर, माता अमृतानंदमयी मठ, श्रीकृष्ण मंदिर, साईनाथनगर आदी परिसर येतो. ५५ हजार ७४ मतदारसंख्या आहे. या प्रभागात उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय आणि गरीब मतदार असून विस्तारही मोठा आहे. ‘क’ जागेसाठी चौरंगी लढत होत आहे. येथून शिवसेनेच्या सुलभा उबाळे, भाजपाच्या संगीता पवार, मनसेच्या अश्विनी चिखले या तीन विद्यमान नगरसेविकांसह राष्ट्रवादी काँगे्रसकडून माजी स्थायी समिती सभापती सुमन पवळे रिंगणात आहेत. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे. यासह येथून काँगे्रसच्या राखी टाक, तर एमआयएमकडून मैमुना शेख या उमेदवार आहेत.
‘अ’ जागेसाठी शिवसेनेकडून अनु गवळी, भाजपाकडून कमल घोलप, राष्ट्रवादीकडून सुषमा खाडे यांच्यात लढत होणार आहे. ‘ब’ जागेसाठी विद्यमान नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे, भाजपाचे उत्तम केंदळे, मनसेचे राजू खाडे, राष्ट्रवादीचे राहुल येवले यांच्यात लढत आहे. बोऱ्हाडे यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीतून शिवसेनेत उडी घेतली आहे.
पाचपैकी दोन विद्यमान नगरसेविका दुसऱ्या पक्षाची, तर तिघी स्वपक्षाकडूनच उमेदवारी मिळवून रिंगणात उतरल्या आहेत. (प्रतिनिधी)