पिंपरी-चिंचवडचे माजी उपहापौर सुदामराव लांडगे यांचे आकस्मित निधन
By विश्वास मोरे | Updated: November 28, 2023 15:11 IST2023-11-28T15:09:31+5:302023-11-28T15:11:11+5:30
भोसरीतील स्मशानभूमी मध्ये लांडगे यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले....

पिंपरी-चिंचवडचे माजी उपहापौर सुदामराव लांडगे यांचे आकस्मित निधन
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहराचे माजी उपहापौर सुदामराव हिरामणराव लांडगे (वय ६७) यांचे आकस्मित निधन झाले. भाजपाचे युवा नेते शिवराज लांडगे यांचे ते वडील होत. उपमहापौर सुदाम लांडगे हे भोसरीतील रहिवासी असून त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २००४ मध्ये निवडणूक लढवली होती तसेच उपमहापौर म्हणून निवड झाली होती. भोसरीतील स्मशानभूमी मध्ये लांडगे यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सुदामराव लांडगे यांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘‘ माझे चुलते पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव लांडगे यांचे आकस्मित निधन झाले. माझा सहकारी आणि भाजपा युवा नेते शिवराज लांडगे यांचे ते वडील होत. शहराच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. त्यांचे अचानक जाणे मनाला चटका लावणारे आहे. माझ्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. लांडगे कुटुंबियांचा आणखी एक मार्गदर्शक हरपला आहे.