माजी नगरसेवकावर चिंचवडमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 14:48 IST2018-03-03T14:48:51+5:302018-03-03T14:48:51+5:30
माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्यासह तीन जणांनी एकास मारहाण केल्याची घटना चिंचवड मध्ये घडली. या बाबत चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी नगरसेवकावर चिंचवडमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल
चिंचवड - माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्यासह तीन जणांनी एकास मारहाण केल्याची घटना चिंचवड मध्ये घडली. या बाबत चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्या सह चंद्या, चंद्याचा भाऊ(पूर्ण नावे समजली नाहीत) व प्रसाद जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या बाबत सागर रमेश कोंडे (वय ४२, रा. दत्तवाडी, पुणे) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी कोंडे हे काही कामानिमित्त चिंचवडगाव बस थांब्याजवळ थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी प्रसाद जाधव याने तुम्ही येथे कशाला आले आहात, येथे परत दिसल्यास तुमचे हातपाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली. तसेच चंद्या याने दातऱ्या असलेल्या मुठीने कोंडे यांच्या डोक्यात मारहाण केली. कोऱ्हाळे यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.इतर साथी दारांनीही लाथा मारल्या.अशी फिर्याद कोंडे यांनी दिली आहे.याबाबत पुढील तपास पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रशांत महाले करीत आहेत.
कोऱ्हाळे हे मागील पंचवार्षिकमध्ये मनसेच्या तिकिटावर चिंचवड मधील केशवनगर भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत त्यांनी मनसेला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला.मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता.