फॉगिंग मशिन खरेदीत घोटाळा

By Admin | Updated: March 8, 2016 00:59 IST2016-03-08T00:59:23+5:302016-03-08T00:59:23+5:30

महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी खरेदी करण्यात येत असलेल्या धूरफवारणी मशिनखरेदीत घोटाळा होत असल्याचे उघड झाले आहे

Fogging machine buying scam | फॉगिंग मशिन खरेदीत घोटाळा

फॉगिंग मशिन खरेदीत घोटाळा

पिंपरी : महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी खरेदी करण्यात येत असलेल्या धूरफवारणी मशिनखरेदीत घोटाळा होत असल्याचे उघड झाले आहे. बाजारात एक मशिन ७ ते १० हजारांना उपलब्ध असताना प्रत्येकी २५ हजार ४४९ रुपये याप्रमाणे एकूण १४ नगांची मशिन खरेदी करणार आहे. त्यामुळे सुमारे सव्वा दोन लाखांचा घोटाळा आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. त्याला नगरसेविका आशा शेंडगे यांनी विरोध केला आहे.
महापालिकेने बाजारभावापेक्षा जादा दराने साहित्य खरेदीचा धडाका लावला आहे. महापालिकेने यापूर्वी बाजारात १० ते १२ लाखांना उपलब्ध असणारे अत्याधुनिक सोनोग्राफी मशिन २२ लाखांना, सात हजार रुपयांना मिळणारे श्रवणयंत्र मशिन १३ हजार रुपयांना खरेदी करण्याचा घाट घातला होता. ही खरेदी चुकीची असल्याचे नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे यांनी उघडकीस आणले होते. त्यावर महापालिकेच्या दक्षता समितीनेही शिक्कामोर्तब केले होते. पितळ उघडे पडल्यानंतर प्रशासनाने या सर्व साहित्याच्या खरेदीसाठी फेरनिविदा मागविली होती. त्यात कमी दराच्या निविदा प्राप्त होऊन करदात्यांच्या पैशांची बचत झाली होती. विविध साहित्याची जादा दराने खरेदी करून महापालिकेतील सत्ताधारी नागरिकांच्या पैशांची अक्षरश: लूट करत आहेत. महापालिकेने बाजारभावापेक्षा
जादा दराने साहित्य खरेदीचा धडाका लावला आहे. त्यामुळे करदात्यांच्या पैशाची मोठ्या प्रमाणात लूट
होत आहे, अशी टीका परिसरातील नागरिकांमधून होत आहे.करदात्यांच्या पैशांची लूट थांबविण्याची
गरज आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Fogging machine buying scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.