पिंपरी - जुना मुंबई-पुणे महामार्गावर नायगाव हद्दीतील गुरुदत्त मंगल कार्यालयात करंजगाव येथील कुडले घरातील नवरी व कशाळ भोयरे येथील जाधव घरातील नवरदेव यांच्या लग्नसोहळ्यात काही जणांचे स्वागत केले नाही म्हणून मानपानाच्या कारणावरून कुडले गट व गायकवाड गट यांच्यात हाणामारी झाली.कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २६) कुडले आणि जाधव परिवाराचा विवाहसोहळ्याचा कार्यक्रम होता. सायंकाळी कैलास बबन गायकवाड, यशवंत बबन गायकवाड, विलास बबन गायकवाड व काशिनाथ बबन गायकवाड (सर्व रा. कांब्रे, मावळ) आणि त्यांच्या सोबत असणारे ८ ते १० जण (नाव पत्ता माहिती नाही) यांनी बेकायदा जमाव जमवून लग्नाचे कार्यक्रमात मानपानाच्या कारणावरून योगेश मारुती कुडले (वय २५), राजेश नारायण कुडले (वय २७), श्रीहरी नारायण कुडले (वय २६), नारायण सदाशिव कुडले (वय ५५), महेश नारायण कुडले (वय ३०, सर्व. रा. करंजगाव, मावळ) यांना मारहाण केल्याची फिर्याद योगेश मारुती कुडले यांनी दिली आहे.तर मंगल कार्यालयात नातेवाइकांच्या लग्नात उपस्थित असताना मारुती कुडले यांना माझा भाऊ यशवंत बबन गायकवाड यांनी माईकवर सुरू असलेले स्वागत बंद करा, लग्नाची वेळ झाली आहे, असे म्हणाल्याच्या कारणावरून मारुती कुडले, राकेश कुडले, नारायण कुडले, ज्ञानेश्वर कुडले, महेश कुडले व इतर ४ ते ५ जण (नाव माहिती नाही, सर्व. रा. करंजगाव, मावळ) यांनी कैलास बबन गायकवाड (वय ३३), यशवंत बबन गायकवाड, विलास बबन गायकवाड, नितीन तुकाराम गायकवाड (सर्व रा. कांब्रे, मावळ) यांना लोखंडी गज, दगडाने डोक्यात, हातावर, पायावर, पाठीत मारहाण करून शिवीगाळ केली. यांना बाहेर जाऊ देऊ नका यांना दगडाने ठेचून मारा अशी दमदाटी केली असल्याची फिर्याद कैलास गायकवाड यांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय एस पाटील करीत आहेत.
स्वागत केले नाही म्हणून लग्न समारंभात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 03:21 IST