Explosion caused by gas leaking from the cylinder; 13 injured, three houses damaged in pimpri | सिलेंडरमधून गॅस गळतीनंतर मोठा स्फोट; १३ जखमी, भोसरीत तीन घरांचे नुकसान

सिलेंडरमधून गॅस गळतीनंतर मोठा स्फोट; १३ जखमी, भोसरीत तीन घरांचे नुकसान

पिंपरी : भोसरी - दिघी रोड येथे महादेव नगर येथील अष्टविनायक सोसायटी येथे रविवारी (दि. ९) सकाळी साडेसहाच्या सुमारास सिलेंडरमधून गळती झालेल्या गॅसने पेट घेतल्याने स्फोट झाला. यात १३ जण जखमी झाले असून त्यामध्ये सात लहान मुलांचा समावेश आहे. जखमींपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

दिघी-भोसरी हद्दीवर असलेल्या अष्टविनायक सोसायटीमध्ये भिंत पडली असल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या मुख्य केंद्राचे दोन बंब दाखल झाले. हा प्रकार केवळ भिंत पडल्याचा नसून गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हा स्फोट सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक 102 मध्ये झाला होता. शनिवारी रात्री घरातील गॅस सिलेंडर सुरु राहिला. रात्रभर सिलेंडरमधून गॅस लिकेज होत राहिला. रविवारी पहाटे घरातील व्यक्तींनी गॅस सुरु करण्याचा प्रयत्न केला असता गॅसचा स्फोट झाला. या स्फोटाची दाहकता शेजारच्या फ्लॅटमध्ये पोहोचली. त्या फ्लॅटमधील काही जण देखील यात जखमी झाले आहेत. 

रात्रभर गळती झाल्याने सिलेंडर मधील गॅस घरात होता. सकाळी गॅस शेगडी सरू करताना घरातील गॅसने पेट घेत मोठा स्फोट झाला. त्यामुळे तीन घरातील साहित्याची पडझड झाली. भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले. दरवाजा तसेच खिडकीची लोखंडी जाळी देखील निखळली. तसेच खिडकीच्या काचांचेही नुकसान झाले.

Web Title: Explosion caused by gas leaking from the cylinder; 13 injured, three houses damaged in pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.