..अशी झाली भिंत खचलेल्या घरात अडकलेल्या गरोदर महिलेची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 17:43 IST2019-05-04T17:39:13+5:302019-05-04T17:43:43+5:30
भिंत खचून घराच्या दरवाजावर पडल्याने दरवाजा बंद झाला. यामुळे घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. अशातच घरामध्ये पाच महिन्यांची गरोदर महिला अडकल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले.

..अशी झाली भिंत खचलेल्या घरात अडकलेल्या गरोदर महिलेची सुटका
पिंपरी : भिंत खचून घराच्या दरवाजावर पडल्याने दरवाजा बंद झाला. यामुळे घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. अशातच घरामध्ये पाच महिन्यांची गरोदर महिला अडकल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले. दरम्यान, याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच काही क्षणातच घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी भिंतीला छिद्र पाडून गरोदर महिलेची सुखरुप सुटका केली. ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पिंपरीतील महात्मा फुले नगर येथे घडली.
संगीता केशवराम निषाद (वय २२) असे सुटका झालेल्या महिलेचे नाव आहे. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या महात्मा फुलेनगर येथे गटर बांधण्याचे काम सुरु असून जवळच निषाद यांचे घर आहे. शनिवारी सकाळी अचानक गटाराजवळची भिंत खचून निषाद यांच्या घराच्या दरवाजावर पडली. यावेळी संगीता घरात एकट्याच होत्या. घराच्या दारावर भिंत पडल्याने घराबाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे आत अडकलेल्या संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती तातडीने अग्निशामक विभागाला दिली. त्यानंतर काही वेळातच संत तुकारामनगर अग्निशामक विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत घराच्या ज्या बाजूने संगीता यांना बाहेर पडणे शक्य होईल त्या बाजूच्या भिंतीला छिद्र पाडून त्याद्वारे संगीता यांना सुखरुपपणे बाहेर काढले.
ही कामगिरी कैलास वाघेरे, चंद्रशेखर घुले, महेंद्र पाठक, विवेक खांदेवाड, प्रतिक कांबळे, विशाल लाडके यांच्या पथकाने केली.