वीज केबल दुरुस्ती कामास वेग

By Admin | Updated: July 28, 2015 00:48 IST2015-07-28T00:48:19+5:302015-07-28T00:48:19+5:30

पावसाळ्यात केबल आणि जोडणी बिघाड होऊन वीज जाऊ नये म्हणून वीज वितरण कंपनीतर्फे दुरुस्तीकाम केले जात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जवळजवळ हे काम

Electric cable repair speed | वीज केबल दुरुस्ती कामास वेग

वीज केबल दुरुस्ती कामास वेग

पिंपरी : पावसाळ्यात केबल आणि जोडणी बिघाड होऊन वीज जाऊ नये म्हणून वीज वितरण कंपनीतर्फे दुरुस्तीकाम केले जात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जवळजवळ हे काम पूर्ण झाले आहे. तरीही पहिल्या पावसात काही ठिकाणी केबल आणि ट्रान्फार्मरमध्ये बिघाड दिसून आले. ते काम त्वरित पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. पावसामुळे शॉर्टसर्किट होऊन काही भागांत वीज जात असल्याचे चित्र आहे.
पाऊस आणि वाऱ्यामुळे अनेक भागांत तार तुटणे, तारांवर झाडांच्या फांद्या पडणे, शॉर्टसर्किट होणे, ट्रान्फार्मरमध्ये बिघाड होणे, असे फॉल्ट निर्माण होतात. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वीज गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. पाऊस आणि त्यात अंधार यांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या गैरसोयीमुळे तक्रारींचा आकडा वाढतो. नागरिकांच्या रोषाला वीज कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागते.
दक्षता म्हणून पिंपरी आणि भोसरी वीज वितरण कंपनी क्षेत्रातील केबल, ट्रान्फार्मर, फिडर, उघड्या तारा आदींचे दुरुस्तीकाम केले गेले आहे. पहिल्या पावसानंतर काही भागांतील तारा तुटल्याने वीज खंडित होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे काही भागांत एक ते दोन दिवस वीज गायब झाली होती. या फॉल्टचा शोध घेऊन ताबडतोब दुरुस्तीकाम पूर्ण केले गेले.
या पद्धतीने पुन्हा स्थिती निर्माण होऊन वीज खंडित होऊ नये, यासाठी काही भागांतील देखभाल आणि दुरुस्ती काम वेगात केले जात आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे तारा तुटून किंवा इतर प्रकारे वीज खंडित होऊ शकते. असा भाग शोधून काढून त्या ठिकाणी प्राधान्याने दुरुस्तीकाम केले जात आहे. पहिल्या पावसामुळे उघड्या तारा आणि ट्रान्फार्मरच्या भोवती झाडांच्या फांद्या आणि वेली वाढल्या आहेत. त्यांची छाटणी केली जात आहे.
खराळवाडी उपकेंद्रातील खराळवाडी आणि महापालिका भवन भागात शुक्रवारपासून वीज वारंवार खंडित होत होती. त्यामुळे या भागातील घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये विजेचा लपंडाव सुरू होता. याचा शोध वीज कर्मचाऱ्यांनी घेतला.
पिंपरी चौकातील बॅँक आॅफ इंडियाजवळच्या एसटीच्या २२ हजार व्होल्ट पॉवरच्या केबलमध्ये फॉल्ट दिसून आला. त्याची दुरुस्ती शनिवारी दुपारी करण्यात आली. ताबडतोब तेथून जोड देऊन वीजप्रवाह पूर्ववत केला आहे. या भागात वीज गेल्याने दुसऱ्या बाजूने तेथे वीजपुरवठा दिला गेला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Electric cable repair speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.