पिंपरी महापालिका भवनाच्या पार्किंगमध्ये बंद पडलेली वाहने ; जागा पडते अपुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 16:39 IST2019-03-17T16:35:50+5:302019-03-17T16:39:25+5:30
वाहनतळाच्या जागेतच बंद पडलेली वाहने वर्षानुवर्षे उभी असल्याने अन्य वाहनांना जागा अपुरी पडत आहे. महापालिका भवनातील अडगळ हटविण्याची मागणी केली जात आहे.

पिंपरी महापालिका भवनाच्या पार्किंगमध्ये बंद पडलेली वाहने ; जागा पडते अपुरी
पिंपरी : महापालिका भवनातील वाहनतळ अपुरे असल्याने रस्त्यावर वाहने लावली जातात. वाहनतळाच्या जागेतच बंद पडलेली वाहने वर्षानुवर्षे उभी असल्याने अन्य वाहनांना जागा अपुरी पडत आहे. महापालिका भवनातील अडगळ हटविण्याची मागणी केली जात आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीत महापालिका भवन आहे. या भवनाची निर्मिती १९८७ मध्ये केली गेली. महापालिका भवनाच्या आवारात नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांसाठी वाहनतळ निर्माण केले आहे. नागरीकरण वाढल्याने, वाहनांची संख्या वाढल्याने महापालिकेत नगरसेवक, नागरिक आणि अधिकारी स्वत:ची वाहने घेऊन येण्याचे प्रमाण वाढल आहे. परिणामी सध्याचे वाहनतळ अपुरे पडत आहे. महापालिका सभा, स्थायी समिती सभेच्या दिवशी आवारात वाहने लावण्यास जागा उपलब्ध राहत नसल्याने महामार्गावरच वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे वाहनतळ अपूर्ण पडत आहे.
महापालिकेसमोर महामार्गापलीकडे वाहनतळाची जागा आहे. तेथील जागाही अपुरी पडत आहे. त्यामुळे नव्याने वाहनतळाची जागा शोधावी, अशी मागणी होत आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी परिसराची पाहणी केली. त्या वेळी परिसरात बंद पडलेली वाहने जागोजागी उभी असल्याचे दिसून आले. तसेच महापालिकेचे अनावश्यक फर्निचरही अस्ताव्यस्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे मडिगेरी यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.
विलास मडिगेरी म्हणाले, ‘‘महापालिका आवारात नादुरुस्त वाहने महिनोंमहिने पडून आहेत. तसेच अनावश्यक फर्निचरही पार्किंगच्या परिसरात पडलेले दिसत आहेत. वाहनतळाच्या जागेतच कचरा आणि नादुरुस्त वाहने दिसत आहेत. परिणामी नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिकांना वाहने लावण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे अडगळीतील कचरा काढावा, तसेच नादुरुस्त वाहने हटविण्यात यावीत. याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.’