रस्ता खोदल्याने वाहतुकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:39 IST2018-04-16T02:39:56+5:302018-04-16T02:39:56+5:30
वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे मार्गावरील मुख्य रस्ता महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने केबल टाकण्यासाठी सर्वत्र खोदला आहे. वाल्हेकरवाडी ते रावेत मुख्य बीआरटीएस चौकापर्यंतचा रस्ता अर्धवट बुजविल्याने येथील अपघात आणि वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे खड्डे पूर्णपणे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

रस्ता खोदल्याने वाहतुकीस अडथळा
रावेत - वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे मार्गावरील मुख्य रस्ता महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने केबल टाकण्यासाठी सर्वत्र खोदला आहे. वाल्हेकरवाडी ते रावेत मुख्य बीआरटीएस चौकापर्यंतचा रस्ता अर्धवट बुजविल्याने येथील अपघात आणि वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे खड्डे पूर्णपणे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
महावितरण कंपनीने या मार्गावर विविध ठिकाणचे रस्ते आणि पदपथ खोदल्याने रावेतकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच सेवा उपयोगिता कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी चर खणण्यास सुरुवात केली आहे. परिणामी वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे या रस्त्यांचा पुरता बोजवारा उडाला आहे. ‘खड्डेच खड्डे चोहीकडे’ अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणचे लहान-मोठे रस्ते खड्डे खणून ठेवल्यामुळे व काही अर्धवट अवस्थेत बुजविल्याने त्याचा राडारोडा रस्त्यावर पडलेला आहे. काही ठिकाणी केबल व्यवस्थित न लावल्याने रस्त्यावरच पडून आहेत. त्यामुळे वाहतुकीचे मार्ग वळवावे लागले आहेत. काही ठिकाणी रस्ता खोदून, अर्धा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या निम्म्या रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. त्याचा फटका पादचाऱ्यांनाही बसू लागला आहे. काही पदपथांवरील पेव्हर ब्लॉक या कामासाठी उखडण्यात आले आहेत. हे ब्लॉक रस्त्यावर पडून असल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे. पदपथ खोदल्याने पादचाºयांना रस्त्यांवरून चालावे लागत आहे.
आयुक्तांना
दिले निवेदन
रस्ता खोदल्याने वाहनचालकांना येथे कसरत करावी लागत आहे. त्यामुळे खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी केली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे त्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. ठेकेदाराकडून तत्काळ या मार्गावरील सर्व खड्डे बुजवून खोदलेला रस्ता डांबरीकरण करून पूर्ववत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सुरक्षेबाबत दक्षता न घेता रस्ताखोदाई
रावेत बीआरटीएस चौक ते किवळेपर्यंतचा रस्ता चुकीच्या पद्धतीने खोदल्याने व त्याचा राडारोडा रस्त्यावरच टाकल्याने दररोज सायंकाळी येथे वाहतूककोंडी होत आहे. ठेकेदाराने काम करताना दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही. काम सुरू असल्याबाबतचे सूचना फलक, बॅरिकेडस, दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यावर असणारे खड्डे आणि केबल लक्षात येत नाही. त्यामुळे अपघातासह वाहतूककोंडीत वाढ झाली आहे. राडारोडा हळूहळू पूर्ण रस्त्यावर पसरला आहे. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत. याच मार्गावर केबल उघड्यावरच ठेवल्या आहेत. त्यामुळेसुद्धा वाहतूककोंडी होत आहे.