सहानुभूती नको, समाजात स्थान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 02:19 IST2016-01-05T02:19:11+5:302016-01-05T02:19:11+5:30
आम्हाला फुकटची सहानुभूती नको, तर आमच्यातील कर्तृत्व ओळखून आम्हाला समाजात स्थान हवे, असे मत अंधांसाठी काम करणाऱ्या सतीश नवले यांनी व्यक्त केले.

सहानुभूती नको, समाजात स्थान द्या
चिंचवड : आम्हाला फुकटची सहानुभूती नको, तर आमच्यातील कर्तृत्व ओळखून आम्हाला समाजात स्थान हवे, असे मत अंधांसाठी काम करणाऱ्या सतीश नवले यांनी व्यक्त केले.
पिंपरी रोटरी क्लब आॅफ प्राधिकरण आणि नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ब्रेल दिनानिमित्त शहरातील दृष्टिहीन व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या वेळी रेडिओ निवेदक सतीश नवले बोलत होते. व्यासपीठावर सीए भूषण तोष्णीवाल यांचा सत्कार करून प्रकट मुलाखत घेतली. डॉ. अनिल पुली यांनी ब्रेल लिपीत लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे, नॉव्हेल ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अमित गोरखे, प्राधिकरण क्लबचे अध्यक्ष शिरीष सॅबेस्टीयन, माजी अध्यक्ष बलवीर चावला, प्रकल्प अधिकारी डॉ. महेश पाटील, केयूर आचार्य आदी उपस्थित होते.
या वेळी प्रभुणे म्हणाले, ‘‘दीव्य दृष्टी असलेल्या दृष्टिहीन व्यक्तीकडून आपण ‘डोळसपणाने काही तरी शिकले पाहिजे. या व्यक्तींसमोर अनंत अडचणी असताना कोणतेही कार्य त्यांच्यासाठी अशक्य नाही. समस्यांवर मात कशी करायची, याचा वस्तुपाठ त्यांच्याकडून शिकला पाहिजे.’’
नवले म्हणाले, ‘‘माझ्या कार्याला तुमच्यासारख्या डोळस मित्रांची साथ लाभल्याने जीवनात काही तरी करता आले. यशात ९० टक्के डोळस मित्रांचे योगदान आहे. देवाने चाणाक्ष बुद्धी, निरीक्षणशक्ती, माणसे जोडण्याची कला दिली. आम्हाला फुकटची सहानुभूती नकोत. आमच्यातील कर्तृत्व ओळखून आम्हाला समाजात स्थान हवे. रस्त्यावर दृष्टिहीन व्यक्ती आढळल्यास त्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करा. त्यांच्याशी मैत्री करा. त्यांचे रायटर बना. त्यांच्या कुटुंबांना समुपदेशन करा.’’
अमित गोरखे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. महेश पाटील यांनी केले. तर आभार शिरीष सॅबेस्टीयन यांनी मानले. (वार्ताहर)