घसरून पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 23:41 IST2018-08-27T23:40:48+5:302018-08-27T23:41:33+5:30

घसरून पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी दुचाकी घसरून दुचाकी बसवर आदळून झालेल्या अपघातात स्वप्ननगरीतील २२ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार संजय घाडगे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास झाला. या अपघातात नीलेश संजय माने (वय २२, रा. स्वप्ननगरी, चाकण) हा तरुण जागीच ठार झाला.
याबाबतची फिर्याद योगेश भगवान पवार (वय २७, रा. बिरदवडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी दिली आहे. सदरचा अपघात सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. नीलेश हा दुचाकी (नंबर नसलेली) वरून नाशिक बाजूकडे विरुद्ध बाजूने जात असताना त्याचा दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी स्लिप झाली. तो दुचाकीसह रोडवर पडून घासत जाऊन नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या बसच्या
डाव्या बाजूच्या चाकावर आदळून अपघात झाला. चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.