शहरात गणेशोत्सवात कोट्यवधींची उलाढाल
By Admin | Updated: September 27, 2015 01:13 IST2015-09-27T01:13:10+5:302015-09-27T01:13:10+5:30
गणेशोत्सवाचा आनंद सर्वांनाच हवाहवासा वाटतो. या उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त होऊ लागले असून, खर्चालाही मर्यादा राहिलेली नाही

शहरात गणेशोत्सवात कोट्यवधींची उलाढाल
मंगेश पांडे,पिंपरी
गणेशोत्सवाचा आनंद सर्वांनाच हवाहवासा वाटतो. या उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त होऊ लागले असून, खर्चालाही मर्यादा राहिलेली नाही. यामुळेच या उत्सवात केवळ पिंपरी-चिंचवड शहरात या वर्षी कोट्यवधींची उलाढाल झाली.
मंडप, देखावा, मिरवणूक, विद्युत व्यवस्था यावर एका मंडळाचा दहा दिवसांचा खर्च लाखोंच्या घरात जात आहे. शहरात अनेक मंडळे आहेत. यामध्ये मोठ्या मंडळांची संख्याही मोठी आहे. उत्सवात करण्यात येणाऱ्या खर्चासाठी सभासदांसह नागरिकांकडून वर्गणी घेतली जाते. जमा-खर्चाचा ताळेबंद न बसल्यास प्रसंगी सभासदच अधिकची वर्गणी काढून अधिकाधिक चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतात.
या उत्सवातील सर्वांत मोठा खर्च असतो मंडप उभारणीसाठीचा. सध्या वीस बाय वीस आकाराच्या मंडपाचा दहा दिवसांचा किमान तीस हजार रुपये खर्च आहे. मात्र, मोठ्या मंडळांचे मंडप या आकारापेक्षाही मोठे असतात. भव्य स्वागत कमान उभारणीसह विद्युत रोषणाई करण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. अशा मंडळांच्या दहा दिवसांच्या मंडपाचा आणि विद्युत व्यवस्थेचा खर्च किमान दोन लाखांपर्यंत जातो. सध्याची मंडळे जिवंत देखावे सादर करण्यावर अधिक भर देत आहेत. या देखाव्यांसाठीचे कलाकार असले, तरी त्यासाठीचा पोशाख व व्हाइस रेकॉर्डिंग यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात. तर, हलत्या देखाव्यांसाठी मूर्तींची आवश्यकता असते. याचे दर मूर्तींच्या उंचीवर अवलंबून असतात. देखाव्याचा पूर्ण संच किमान वीस हजारांपासून दीड ते दोन लाखांपर्यंत असतो. दहा दिवसांच्या देखाव्यावर मंडळाचा किमान तीन ते चार लाखांचा खर्च होतो. बहुतेक मंडळे विसर्जन मिरवणूक अधिकाधिक भव्य आणि आकर्षक होण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा वेळी खर्चाचाही विचार केला जात नाही. मूर्ती नेण्यात येणाऱ्या ट्रॉलीवरील सजावटीकडे अधिकाधिक लक्ष दिले जाते. फुलांचे, ओढण्यांचे सजावटीचे सेट तयार केले जातात. यासाठी ८० हजार ते १ लाखांपर्यंतचा खर्च येतो. यासह काही मंडळे मिरवणूक रथापुढे देखावादेखील करतात. यासाठीही मोठ्या प्रमाणात खर्च येतो. चित्तथरारक खेळ, फटाक्यांची आतषबाजीही असते. मिरवणुकीसाठी आवश्यक असलेले ट्रॅक्टर मिळणेही कठीण झाले आहे. भरमसाठ पैसे देऊनही ट्रॅक्टर उपलब्ध होत नाहीत. या ट्रॅक्टरसाठी तासावर भाडे आकारले जात आहे. दोन ते तीन हजार रुपये भाडे घेतले जात आहे.
मिरवणुकीत ध्वनिक्षेपक लावण्यास बंदी आहे. त्यामुळे बहुतेक मंडळे ढोल-ताशा पथक आणतात. या पथकातील सदस्यांची संख्या, ढोलची संख्या आणि किती वेळ वाजविणार आहे, यावर त्या पथकाचे मानधन अवलंबून असते. मात्र, मंडळाच्या कार्यकर्त्यांकडूनही पथकात अधिकाधिक ढोल असावेत, अशी मागणी असते. त्यामुळे मानधनही त्याच तुलनेत मोजावे लागते. किमान पन्नास हजारांपासून एक लाखांपर्यंत मानधन घेतले जाते.