Corona virus : पिंपरी शहरात सोमवारी दिवसभरात आढळले हजार कोरोनाबाधित रूग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 23:59 IST2020-07-27T23:59:04+5:302020-07-27T23:59:15+5:30
गेल्या पाच महिन्यात शहरात आजपर्यंत १७ हजार २६४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे .

Corona virus : पिंपरी शहरात सोमवारी दिवसभरात आढळले हजार कोरोनाबाधित रूग्ण
पिंपरी : लॉकडाऊन सहामध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. शहराच्या विविध भागातील ९८१ आणि शहराबाहेरील ४३ अशा १ हजार २४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ४ हजार ४११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या ६९९ जणांना घरी सोउले आहेत. तर दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज ४ हजार ९९९ जणांना डिस्चार्ज दिला आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. महापालिकेच्या रूग्णालयात ४ हजार ९०९ जणांना दाखल केले असून ४ हजार ४११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविलेल्या ७१२ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे सध्या रूग्णालयात ३ हजार ४११ जण दाखल आहेत.
दहा जणांचा बळी
पिंपरी-चिंचवड शहरातील आठ आणि पुण्यातील दोन अशा दहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात सांगवीतील ७५ वर्षीय वृद्ध, निगडी, यमुनानगरमधील ८८ वर्षीय वृद्ध, पिंपरीतील ५०, ४८ वर्षीय दोन पुरुष, भोसरीतील २६ वर्षाचा युवक, मोशीतील ९४ वर्षीय वृद्ध, ३६ वर्षाचा युवक, थेरगावातील ७६ वर्षीय वृद्ध, मुळशीतील ६६ वर्षीय पुरुष आणि येरवडा येथील ४८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. शहरातील २९२ जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या ७७ अशा ३६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण अधिक
गेल्या पाच महिन्यात शहरात आजपर्यंत १७ हजार २६४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. आज दिवसभरात ६९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकुण ११ हजार ५३० जण बरे होऊन घरी गेले आहेत.