Corona virus : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दररोज होणार ४०० स्वॅबची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 15:23 IST2020-07-08T15:20:12+5:302020-07-08T15:23:32+5:30
अवघ्या अर्ध्या तासात संशयितांना कोरोनाची लागण झालेली आहे की नाही याची माहिती मिळणार

Corona virus : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दररोज होणार ४०० स्वॅबची तपासणी
पिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत संशयित रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल मोठ्या संख्येने प्रलंबित रहात असलने पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आरटीपीसीआर स्वॅब टेस्टींग लॅब मंगळवारी (दि. ७) कार्यान्वित करण्यात आली आहे.
महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक योगेश बहल, नगरसेविका सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, डॉ. प्रवीण सोनी, डॉ. सतीश पाटील, डॉ. मोकाशी आदी या वेळी उपस्थित होते.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे अॅन्टिजेन किट उपलब्ध झाले आहेत. याद्वारे सुमारे एक लाख कोरोनाची लक्षणे असणारे तसेच कोरोबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी होणार आहे. अवघ्या अर्ध्या तासात संशयितांना कोरोनाची लागण झालेली आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अशा संशयितांची स्वॅबद्वारे तपासणी होईल. महापालिकेचे फ्रन्टलाईन कर्मचारी, कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉट मधील भाजी विक्रेते, रेशनिंग दुकानदार तसेच ज्या व्यक्तींना अतिजोखमीचे आजार आहेत, अशा व्यक्तींची या किटद्वारे चाचणी होईल. महापालिकेच्या सर्व विभागीय रुग्णालयांमध्ये बुधवारपासून त्याचा वापर सुरू होईल.
महापौर ढोरे म्हणाल्या, गेल्या आठवड्यात स्वॅब टेस्टींग लॅबकरीता आयसीएमआरची मान्यता मिळालेली होती. त्या माध्यमातुन दररोज ३५० ते ४०० स्वॅब टेस्टींग होणार आहेत. यामुळे संशयित कोरोना रुग्णांचा तपासणी अहवाल प्रलंबित न राहता जलद गतीने प्राप्त होण्यास मदत होईल. अधिकाधिक रुग्णांच्या चाचण्या कमी वेळात आणि कमी खर्चात होण्यासाठी या नव्या अतिजलद चाचणी होईल. १५ ते ३० मिनिटांत त्याचा अहवाल मिळणार आहे.
नामदेव ढाके म्हणाले, अँटिजेन टेस्टिंग रुग्णांना वरदानच ठरणार आहे. जलद गतीने होणाºया चाचण्यांमुळे अधिकाधिक रुग्णांचं निदान होईल. बाधित रुग्णांची संख्या कदाचित सुरुवातीला जास्त असेल; पण आजाराच्या सुरुवातीलाच निदान झाल्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण आणि ते मृत्युमुखी पडण्याची संख्या मर्यादित होईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडेल.