Corona virus : पिंपरी येथील ‘वायसीएम’रुग्णालयाच्या प्लाझ्मा संकलन पेढीवर ' लोड '
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:49 IST2020-09-25T13:49:46+5:302020-09-25T13:49:56+5:30
महापालिका प्रशासन अन् लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री अभावी डॉक्टर हतबल

Corona virus : पिंपरी येथील ‘वायसीएम’रुग्णालयाच्या प्लाझ्मा संकलन पेढीवर ' लोड '
पिंपरी : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्लाझ्मा संकलन करणाऱ्या वायसीएम हॉस्पिटलमधील प्लाझ्मा संकलन पेढीवर ताण येत आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर चालणारी या प्लाझ्मा संकलन पेढीतील ९ कर्मचारी कोरोबाधित झाले आहेत. प्रतिदिन २४ बॅग प्लाझ्मा संकलनाची क्षमता आहे. दररोज संकलन होणाऱ्या प्लाझ्मापेक्षा चारपट जास्त प्लाझ्माची मागणी होत आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मोफत प्लाझ्मा उपलब्ध होत आहे. तसेच, वायसीएम व्यतिरिक्त अन्य रुग्णालयातील रुग्णांसाठी हस्तांतरण शुल्क अवघे ४०० रुपये घेवून प्लाझ्मा दिला जात आहे. राज्यातील खासगी तसेच काही शासकीय रक्तपेढ्यांमध्ये सुमारे १० ते १२ हजार रुपयांपर्यंत २०० मीली प्लाझ्माच्या बॅगचे शुल्क आकारले जाते. त्यामुळे वायसीएममध्ये मोफत किंवा नाममात्र शुल्कात (४०० रुपये) प्लाझ्मा मिळवण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी होत आहे. या प्लाझ्मा संकलन पेढीची दैनंदिन क्षमता केवळ २४ बॅग इतकी आहे. अवघे १२ दाते प्लाझ्मादान करु शकतात. दैनंदिन किमान १०० बॅगची मागणी आहे. संकलन पेढीवर आलेल्या प्रत्येक नागरिकाला प्लाझ्मा मिळावा, अशी अपेक्षा असते. मग, प्लाझ्मा उपलब्ध न झाल्यास वाद निर्माण होत आहे. वायसीएम प्लाझ्मा संकलन पेढीमध्ये १८ टेक्निशियन, ४ बीटीओ आणि २ डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र आपल्याकडे ११ टेक्निशियन, २ डॉक्टर आणि ४ वॉर्डबॉय आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी ९ जण कोरोनाबाधित झाले आहेत. मनुष्यबळासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती. पत्रव्यवहार केला आहे. पण, कार्यवाही केली जात नाही. ............ महापालिका स्थायी समिती सभेत नगरसदस्यांनी वायसीएम रुग्णालयातील प्लाझ्मा संकलन पेढीतून मोफत प्लाझ्मा देण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय विभागाने सशुल्क प्लाझ्मा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, लोकप्रतिनिधींनी पैसे वाचवण्यापेक्षा लोकांचे प्राण वाचले पाहिजेत…असा हट्ट धरला. मात्र, प्लाझ्मा दाते उपलब्ध होतील का? आपल्याकडे मनुष्यबळ पुरेसे आहे का? याचा विचार केला नाही, असे भाजपाचे संजय पटनी यांनी सांगितले ........... रक्त संकलन अधिकारी डॉ. शंकर मोसलगी म्हणाले, ''सध्यस्थितीला आम्ही वायसीएम रुग्णालयातील रुग्णांची प्लाझ्मा मागणी उपलब्ध करुन देवू शकतो. तेवढी क्षमता पेढीची आहे. पण, अतिरिक्त मागणीची पूर्तता होवू शकत नाही.''