जबरदस्तीने लग्न लावल्याची तरुणाविरुद्ध तक्रार
By Admin | Updated: May 30, 2017 02:30 IST2017-05-30T02:30:31+5:302017-05-30T02:30:31+5:30
दीड वर्षांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली़ दीड वर्षांपासून सुरू असलेल्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. शितपेयात गुंगीचे औषध टाकून

जबरदस्तीने लग्न लावल्याची तरुणाविरुद्ध तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : दीड वर्षांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली़ दीड वर्षांपासून सुरू असलेल्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. शितपेयात गुंगीचे औषध टाकून तरुणीला आळंदी येथे नेले. आईवडिल, लहान बहिणीस जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहासंबंधीच्या कागदपत्रांवर जबरदस्तीने तिच्या सह्या घेतल्या. फेब्रुवारीत हा प्रकार घडला.
तरुणी तिच्या आई वडिलांकडेच होती, ‘‘लग्न झाले आहे, नांदण्यास ये’’असे म्हणून तरुण तिला त्याच्या घरी घेऊन जाऊ लागला. त्या वेळी विरोध करून तरुणीने थेट पोलिसांकडे धाव घेतली. लग्न मान्य नसल्याचे सांगत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सागर कृष्णा लांगे (वय ३३, विकासनगर, देहूरोड) असे आरोपीचे नाव आहे.
फेसबुकच्या माध्यमातून आरोपीची तरुणीशी ओळख झाली. फेसबुकवरच त्यांची मैत्री झाली. तरुणाचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जडले. ६ फेब्रुवारी २०१७ ला तरुणाने तिला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन आळंदीला नेले. तेथे गेल्यानंतर तिचे आईवडिल आणि लहान बहीण यांना जिवे मारणार असल्याचे धमकावून विवाहासंबंधीच्या कागदपत्रावर सह्या करण्यास भाग पाडले. संमती नसताना जबरदस्तीने आळंदी येथे लग्न केले. त्यानंतर तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या आई वडिलांच्या घरी गेली. काही दिवसांपूर्वी तरुण तिला नंदण्यास ये असा आग्रह धरू लागला. लग्न संमतीने झाले नाही, जबरदस्तीने झाले आहे, त्यामुळे नांदण्यास जाण्यास तिने नकार दिला. तो आग्रह धरू लागल्याने तिने थेट पोलिसांकडे धाव घेतली.