अभिजात संगीत नाट्यकृतींनी रसिक झाले दंग
By Admin | Updated: January 7, 2016 01:07 IST2016-01-07T01:07:36+5:302016-01-07T01:07:36+5:30
नादब्रह्म परिवाराच्या महोत्सवी वर्षानिमित्त नादब्रह्म प्रस्तुत मा. दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सवात रसिकांनी अभिजात संगीत नाट्यकृतींचा आस्वाद घेतला.

अभिजात संगीत नाट्यकृतींनी रसिक झाले दंग
पिंपरी : नादब्रह्म परिवाराच्या महोत्सवी वर्षानिमित्त नादब्रह्म प्रस्तुत मा. दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सवात रसिकांनी अभिजात संगीत नाट्यकृतींचा आस्वाद घेतला.
चिंचवड येथे संगीत नाट्य महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले. भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक शंतनू पेंडसे हे प्रमुख पाहुणे होते. थोर व्यक्तींना केवळ दंडवत न घालता त्यांचे विचार जनमनापर्यंत पोहोचविले पाहिजेत व ते कार्य कलेच्या माध्यमातून नादब्रह्म परिवार करीत आहे, असे राजदत्त म्हणाले. संस्थेचे सचिव अरुण चितळे यांनी प्रास्ताविक केले.
महोत्सवाचा प्रारंभ स्वा. सावरकरलिखित संगीत सन्यस्त खड्ग या नाटकाने झाला. त्यात प्रमोद पवार, डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. वंदना घांगुर्डे, चिन्मय पाटसकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. नाटक सुरू होण्याआधी अनाहत संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी नांदी सादर केल्या. नाटकास संगीत साथ आॅर्गन-लीलाय चक्रदेव, तबला-विघ्नहरी देव, व्हायोलिन-अविनाश लघाटे अशी होती. संगीत दिग्दर्शन डॉ. रवींद्र घांगुर्डे यांचे होते. नाटकाच्या निर्मात्या डॉ. वंदना घांगुर्डे आहेत. या प्रसंगी स्वा. सावरकरांचा जीवनपट उलगडणारे चित्रप्रदर्शन भरवण्यात आले होते.
दि. ३ जानेवारी रोजी अलौकिक प्रतिभेच्या कवींच्या कविता व गीते आधारित शब्दांचीच रत्ने हा कार्यक्रम सादर झाला. सावनी रवींद्र यांच्या कार्यक्रमाचा प्रारंभ याच महोत्सवात झाला. कवी वैभव जोशी व प्रमोद पवार यांचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)