नागरिकहो, दलालांपासून सावध राहा! थेट अधिकाऱ्यांशी संपर्काचे पीएमआरडीएतर्फे आवाहन
By नारायण बडगुजर | Updated: February 5, 2025 17:29 IST2025-02-05T17:29:38+5:302025-02-05T17:29:46+5:30
पीएमआरडीए कार्यालयात नागरिक आपली शासकीय कामे घेऊन सातत्याने येत

नागरिकहो, दलालांपासून सावध राहा! थेट अधिकाऱ्यांशी संपर्काचे पीएमआरडीएतर्फे आवाहन
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयात काही आर्किटेक्ट आणि मध्यस्थी व्यक्ती नागरिकांना परस्पर भेटून तुमची कामे आम्ही करून देतो, असे सांगून दिशाभूल करत आहेत. त्यामुळे संबंधित नागरिकांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आपली कामे थेट संबंधित विभागाकडून करून घ्यावीत, असे आवाहन पीएमआरडीएतर्फे करण्यात येत आहे.
पीएमआरडीए कार्यालयात नागरिक आपली शासकीय कामे घेऊन सातत्याने येत असतात. यात प्रामुख्याने बांधकाम परवानगी, जमीन मालमत्ता आणि अनधिकृत बांधकाम विभागासह इतर ठिकाणी नागरिक आपल्या कामांसाठी येतात. मात्र, काही आर्किटेक्ट, अन्य मध्यस्थी व्यक्ती जागा मालकाला परस्पर गाठून तुमची कामे आम्ही करून देतो, असे सांगून त्यापोटी आर्थिक मागणी करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
मात्र, अशा प्रकारे पीएमआरडीएमध्ये कुठलीच कामे होत नसल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतः आपल्या कामासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, एजंट किंवा इतर मध्यस्थी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पीएमआरडीए प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.