शहरवासीयांनी दाखवावी सजगता
By Admin | Updated: January 6, 2016 00:32 IST2016-01-06T00:32:36+5:302016-01-06T00:32:36+5:30
राज्यातील आठ विभागांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभाग आघाडीवर आहे. तक्रारींची दखल घेऊन लाचखोरांवर कारवाई करण्यात पुणे विभागाने आघाडी घेतली असली

शहरवासीयांनी दाखवावी सजगता
पिंपरी : राज्यातील आठ विभागांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभाग आघाडीवर आहे. तक्रारींची दखल घेऊन लाचखोरांवर कारवाई करण्यात पुणे विभागाने आघाडी घेतली असली, तरी पिंपरी-चिंचवडकरांचे तक्रारीचे प्रमाण अत्यल्प आहे. गतवर्षात या शहरातील केवळ तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. नागरिकांनी पुढाकार घेऊन सजगता दाखविल्यास पिंपरी-चिंचवडमधील लाचखोरांवर कारवाई करणे शक्य होईल, असा विश्वास लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
रोटरी क्लब आॅफ आकुर्डी-पुणे शाखेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अधीक्षक सरदेशपांडे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘२०१४ या आर्थिक वर्षात संपूर्ण राज्यात आठ विभागांच्या वतीने १२१५ ठिकाणी सापळे लावून लाचखोरांवर कारवाई केली, तर २०१५ या वर्षात लाचखोरांवर कारवाई केल्याची १२३४ प्रकरणे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या पाच जिल्ह्यांत केलेली कामगिरी राज्यातील अन्य सात विभागांच्या तुलनेने चांगली आहे.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, सांगली आदी ठिकाणी २०१४ मध्ये २१३ ठिकाणी सापळे रचून कारवाई केली होती. तर २०१५ मध्ये २१७ ठिकाणी सापळे रचून यशस्वी कारवाई केली. अधिकाऱ्यांकडे, लोकसेवकाकडे एजंट म्हणून काम करणाऱ्यांविरुद्ध या विभागामार्फत कारवाई केली जाते. अशा व्यक्तींबद्दलच्या तक्रारी देण्यास नागरिकांना पुढाकार घ्यावा. लाच देणे आणि घेणे दोन्ही कृत्यांसाठी कारवाई होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी लाच देऊन कामे करवून न घेता, रीतसर नियमानुसार कामे करवून घेण्यास प्राधान्य द्यावे.
या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक श्रीहरी पाटील,अनघा देशपांडे, पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे, पोलीस कर्मचारी दीपक टिळेकर यांच्यासह आकुर्डी रोटरी क्लबचे अध्यक्ष राकेश आगरवाल, सचिव आनंद आगरवाल, जसविंदर सोनी, रवी नामदे, सचिन पारेख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)