चिटफंडचे गुंतवणूकदार चिंताग्रस्त
By Admin | Updated: December 9, 2015 00:17 IST2015-12-09T00:17:37+5:302015-12-09T00:17:37+5:30
चिटफंडमध्ये गुंतविण्यात आलेल्या मोठ्या रकमांचे गैरव्यवहार होत असल्याच्या ठिकठिकाणच्या घटना उघड होऊ लागल्या आहेत.

चिटफंडचे गुंतवणूकदार चिंताग्रस्त
पिंपरी : चिटफंडमध्ये गुंतविण्यात आलेल्या मोठ्या रकमांचे गैरव्यवहार होत असल्याच्या ठिकठिकाणच्या घटना उघड होऊ लागल्या आहेत. कोट्यवधींचे आर्थिक घोटाळे केल्याप्रकरणी पुणे, पिंपरी-चिंचवडमधील काही चिटफंड चालकांविरोधात पोलिसांकडे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले असून संभ्रमात पडले आहेत.
दुप्पट, तिप्पट आर्थिक लाभाचे आमिष दाखवून चिटफंड तसेच अन्य खासगी संस्थांच्या फसव्या वित्त योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. कालांतराने चिटफंड अथवा अशा संस्थांचे संचालक गाशा गुंडाळून गायब होतात. पुणे जिल्ह्यात चिटफंड संचालकांवर दाखल होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहेत. केलेली गुंतवणूक वाया जाणार की काय? दुप्पट रक्कम मिळणे तर दूरची बाब. गुंतवणूक केलेली मूळ रक्कम तरी परत मिळेल का? अशी विंवचना त्यांच्यापुढे आहे. ज्या चिटफंड संस्थांचा आर्थिक घोटाळा चव्हाट्यावर आलेला नाही, संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल नाहीत, अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करणारेही भयभीत झाले आहेत. वृत्तपत्रात बातमी येताच आपण ज्या चिटफंडमध्ये गुंतवणूक करतो, त्या संस्थेचे तर नाव नाही ना? अशी शंका त्यांच्या मनात निर्माण होत आहे.
शहरातील काही चिटफंड संचालकांनी गुंतवणूकदारांचे जमा झालेले पैसे बांधकाम व्यवसायात व अन्यत्र गुंतवले आहेत. (प्रतिनिधी)