पिंपरी : शाळेत गैरहजर राहिल्याच्या कारणावरून चिखली (जाधववाडी) येथील साई जीवन प्राथमिक शाळेत शिक्षकाने पाचवीत शिकणा-या विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या अशा प्रकारच्या तीन घटना गेल्या सहा महिन्यांत शहरात घडल्या आहेत. त्यामुळे या प्रकाराबद्दल पालक व नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.चिखली येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेची साई जीवन प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पाचवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आजारी असल्यामुळे दोन दिवस शाळेत गैरहजर राहिली. सलग दोन दिवस ती गैरहजर राहिल्यामुळे शिक्षक श्रीकृष्ण केंगळे यांनी दोन विद्यार्थ्यांना तिच्या घरी चौकशीसाठी पाठवले. त्यांच्याबरोबर विद्यार्थिनी शाळेत आली. शिक्षक केंगळे यांनी तिला गैरहजर राहण्याचे कारण विचारत बेदम मारहाण केली. घरी गेल्यानंतर तिने सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यांनी त्वरित स्थानिक नगरसेवक राहुल जाधव यांच्या कार्यालयात जाऊन याबाबत माहिती दिली. नगरसेवक जाधव यांनी शिक्षण अधिकाºयांना याबाबत माहिती दिली.या प्रकरणी महापालिकेचे शिक्षण अधिकारी बी. एस. आवारी म्हणाले की, मुख्याध्यापिका रजेवर असल्याने लता गायकवाड यांच्याकडे तात्पुरता पदभार आहे. मारहाण करणारे शिक्षक केंगळे व गायकवाड यांची चौकशीकेली जाणार आहे. दोषी आढळून येणाºयांवर कारवाई केली जाईल.
पिंपरी : चिखलीत शिक्षकाकडून विद्यार्थिनीला मारहाण,अधिका-यांकडून चौैकशी : मनपा शाळेतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 06:35 IST