पिंपरी : मावळ खासदार श्रीरंग बारणे यांनी निवडणुकांच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी खटला चालवण्याचे आदेश मावळ विशेष न्यायालयाने दिले आहेत. बारणे यांनी निवडणुकांच्या वेळी त्यांच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार अनिल भांगरे आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी न्यायालयाकडे केली होती.
बारणे यांनी २००९ आणि २०१९ च्या निवडणुकांदरम्यान नामनिर्देशन पत्रासोबत दिलेल्या शपथपत्रात जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला होता. २०१९ च्या शपथपत्रात बारणे यांनी शैक्षणिक पात्रता 'दहावी नापास' अशी नमूद केली होती, तर २००९ मध्ये त्यांनी 'दहावी उत्तीर्ण, सन १९८९' असे लिहिले होते. याशिवाय, त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यात पिंपरी न्यायालयातील एक प्रकरण आणि निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा समावेश आहे.पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानंतर डॉ. हरिदास यांनी युक्तिवाद केला. या निष्कर्षांच्या आधारे न्यायालयाने बारणे यांच्याविरोधात लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम १२५-अ अंतर्गत कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.