पिंपरी : सिंगापूरमध्ये नोकरी लावतो, असे सांगून एकूण १३.५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी दापोडी येथील ४० वर्षीय संशयित महिलेविरोधात दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २०२३ ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत दिघी येथे घडली. अतुल सुभाष रुणवाल (वय ५१, रा. दिघी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (१३ जून) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतुल व रवींद्र वाळके यांचा संशयित महिलेने विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सिंगापूरमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनुक्रमे ८ लाख व ५.०५ लाख, असे एकूण १३.५ लाख रुपये घेतले. मात्र, वेळोवेळी टाळाटाळ करत नोकरीही लावली नाही आणि पैसेही परत दिले नाहीत. पोलिस उपनिरीक्षक शंभू रणवरे तपास करीत आहेत.