विद्यार्थ्यांच्या पाठी दप्तराचे ओझे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 02:05 IST2018-12-07T02:05:01+5:302018-12-07T02:05:08+5:30
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मुलांच्या दप्तराच्या कमाल वजनाची मर्यादा घालून दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठी दप्तराचे ओझे
- प्रकाश गायकर
पिंपरी : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मुलांच्या दप्तराच्या कमाल वजनाची मर्यादा घालून दिली आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ‘लोकमत’ प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीमध्ये मुलांच्या दप्तराच्या वजनाची मोजणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलांच्या दप्तराविषयी घालून दिलेल्या निर्देशांची पायमल्ली होताना दिसत आहे.
शाळकरी अन् चिमुकल्या मुलांना दप्तराचे ओझे जास्त लादू नका, असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहेत. असे असतानाही शहरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे असल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले. अनेक लहान बालके भल्यामोठ्या स्कूलबॅग आपल्या खांद्यावर घेऊन जाताना दिसले. जोडीला वॉटरबॅग आणि टिफिनबॅग असल्याने दप्तर सांभाळावे की या बॅग सांभाळाव्यात, अशी अवस्था विद्यार्थ्यांची होताना दिसत आहे. अनेक मुलांचे पालक हे ओझे आपल्या खांद्यावर वाहून मुलांना गाडीजवळ सोडत असल्याचे पाहायला मिळाले. शालेय वयातच मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू आहेत. पालकही माझाच मुलगा कसा पुढे जाईल, या दृष्टीने मुलांना शाळेत, खासगी शिकवणीमध्ये पाठवतात. शिक्षणाच्या या जीवघेण्या
स्पर्धेमध्ये शाळा व इतर खासगी शिकवणीचा भार वाहताना मुले जगणे हरवून बसली आहेत.
मुलांच्या दप्तराच्या वजनाबाबत पालकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. पालकांशी याबाबत चर्चा केली असता अनेक पालकांनी याबाबत शाळांना जबाबदार धरले आहे. एका विषयासाठी तीन वह्या, तसेच वर्क बुक यांचीही संख्या जास्त असल्याने दप्तराचे ओझे वाढत असल्याचे पालकांनी सांगितले.
>इयत्तेनुसार दप्तराचे ओझे
पहिलीतील एका मुलीच्या पाठीवर तब्बल ३ किलो ३२ ग्रॅम वजनाचे दप्तर आढळून आले.
तिसरीतील विद्यार्थ्याचे ४ किलो वजनाचे दप्तर होते.
पाचवीच्या विद्यार्थ्याच्या पाठीवर ४ किलो २६४ ग्रॅम इतके वजन आढळले.
सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्याच्या दप्तराचे वजन केले असता ते ५ किलो भरले.
दहावीच्या विद्यार्थ्याच्या दप्तराचे ओझे तब्बल ८ किलो ५५० किलोग्रॅम असल्याचे समोर आले.
>विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे त्यांना पाठदुखी, खांदेदुखीचा त्रास होत असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच मुलांचे स्नायूही दुखतात. मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे असेच जास्त प्रमाणात राहिले, तर भविष्यामध्ये मुलांना मोठ्या आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल. वजनदार दप्तर घेऊन मुलांना जास्त प्रवास करावा लागत असेल तर, त्यांच्या मणक्यांना त्रास होऊ शकतो. तसेच पाठीला बाक निघण्याची शक्यता असते.
- डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका