'SHIVDE I AM SORRY'; प्रेयसीची माफी मागण्यासाठी 'त्याने' गावभर लावले फलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 14:20 IST2018-08-18T13:48:42+5:302018-08-18T14:20:18+5:30
प्रेयसीला पटवण्यासाठी एखादा प्रियकर काय करेल याचा नेम नाही. असाच एक प्रकार पिंपरीमध्ये घडला आहे.

'SHIVDE I AM SORRY'; प्रेयसीची माफी मागण्यासाठी 'त्याने' गावभर लावले फलक
पिंपरी चिंचवड : प्रेयसीला पटवण्यासाठी एखादा प्रियकर काय करेल याचा नेम नाही. असाच एक प्रकार पिंपरीमध्ये घडला आहे. प्रेयसीवर असलेल्या प्रेमापोटी एका प्रियकराने रस्त्यांवर ‘शिवडे आय एम सॉरी!’ अशा आशयाचे तब्बल 300 फलक लावले आहेत. तरुणाच्या या विचित्र कारनाम्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
उच्चभ्रु अशी ओळख असलेल्या पिंपळेसौदागर या परिसरातील शिवार चौकात 'shivade i am sorry''असा मजकूर लिहिलेले फलक झळकले आहेत. पुण्याच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर हे फलक दिसू लागल्याने पोलिसांनी याप्रकरणाचा शोध घेतला. पोलिसांना तपासादरम्यान नीलेश खेडकर या पुण्यातील तरुणाने त्याचा मित्र आदित्य शिंदे याला असे फलक लावायला सांगितल्याचं समजलं. रस्त्यावरील ‘शिवडे आय एम सॉरी!’ चे बॅनर पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं आहे. सोशल मीडियावरही या बॅनरचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून तरुणाला बेकायदा बॅनरबाजी केल्यामुळे 72 हजारांचा दंडही बसू शकतो.