बोपोडीत महापालिकेचे नेत्र रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:42 IST2018-11-12T23:41:41+5:302018-11-12T23:42:02+5:30

सुपर आय केअरचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

Bopodital Municipal Eye Hospital | बोपोडीत महापालिकेचे नेत्र रुग्णालय

बोपोडीत महापालिकेचे नेत्र रुग्णालय

पुणे : व्हिजन नेक्स्ट फाउंडेशन व पुणे महानगरपालिकेतर्फे बोपोडीत उभारण्यात आलेल्या दत्तात्रय वळसे पाटील सुपर आय केअर (नेत्र विकार) स्पेशालिटीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावर आयटी पार्कजवळ हा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

शहर व शहराबाहेरील नेत्रविकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना या रुग्णालयामुळे दिलासा मिळाला आहे. या कार्यक्रमाकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार काय बोलतात याकडेदेखील सर्वांचे लक्ष होते. मात्र पवार यांनी केवळ औपचारिकरीत्या उद्घाटन करून जाणार असल्याचे संयोजकांना सांगितले. मात्र त्यापूर्वीच ते प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याचे सांगितल्याने शेजारील कक्षात पत्रकार त्यांना प्रश्न विचारण्याकरिता उत्सुक होते. प्रत्यक्षात पवार उद्घाटन करुन तातडीने मार्गस्थ झाल्याने सर्वांचीच निराशा झाली. पुण्यातील खासदारकीकरिता राष्ट्रवादी पक्ष उत्सुक असल्याची चर्चा आहे. यापूर्वी काँग्रेस पक्षाकडून खासदारकीकरिता उमेदवार देण्यात आला आहे. पुढील काळात काँग्रेस नव्हे तर राष्ट्रवादीतर्फे खासदारकीसाठी उमेदवार देण्याची तयारी सुरु आहे. याविषयी पवारांना प्रश्न विचारण्याकरिता उत्सुक असलेल्या माध्यमाच्या प्रतिनिधींचा मात्र हिरमोड झाला.
 

Web Title: Bopodital Municipal Eye Hospital