किरकोळ कारणावरून भोसरीत तरूणाची गळा आवळून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 13:49 IST2017-08-28T13:47:40+5:302017-08-28T13:49:44+5:30
किरकोळ कारणावरून भोसरीत तरूणाची दोन जणांनी गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे.

किरकोळ कारणावरून भोसरीत तरूणाची गळा आवळून हत्या
पिंपरी, दि. 28- दुचाकीची चावी दिली नाही, याचा राग आल्याने दोन जणांनी एका तरूणाची मारहाण करत गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास भोसरी येथे ही घटना घडली. सतिश ज्ञानोबा इंदले (वय १८,रा.बालाजीनगर, भोसरी) असं मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी दोन आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरूण आणि आरोपी एकाच ठिकाणी काम करतात. त्यांची एकमेकांशी पहिल्यापासून ओळख आहे. बालाजीनगर भोसरी येथे रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास सतिश इंदले याच्याकडे आरोपींनी दुचाकीची चावी मागितली. त्याने चावी देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने दोन्ही आरोपींनी आपसात संगनमत करून सतिशला लाथा बुक्यांनी मारहाण केली. दाद्या भोसले याने त्यास पकडून ठेवले. अमिर शेख या आरोपीने त्याचा हाताने गळा आवळला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपींविरोधात एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.