घरकुल योजनेचा लाभ मिळावा
By Admin | Updated: January 22, 2016 01:22 IST2016-01-22T01:22:51+5:302016-01-22T01:22:51+5:30
आर्थिक दुर्बल घटकांना घरकुल मिळावे यासह विविध मागण्यांसाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने महापालिका प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली

घरकुल योजनेचा लाभ मिळावा
पिंपरी : आर्थिक दुर्बल घटकांना घरकुल मिळावे यासह विविध मागण्यांसाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने महापालिका प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. पिंपरी येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर गुरुवारी सकाळी निदर्शने झाली.
पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या वेळी धर्मराज जगताप, शोभा शिंदे, आशा कांबळे, प्रल्हाद कांबळे, संभाजी गोरे, अंकुश चव्हाण, कौशल्या नेटके, शकुंतला थिटे आदींसह घरकुलधारक उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने शहरातील गोरगरीब जनतेसाठी आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबवली जात आहे. परंतु, या योजनेत काही व्यक्तींना घरे मिळाली आहेत. अनेक जणांना अजूनही घरकुल मिळालेले नाही. गरजू आणि गरिबांना घरकुल मिळावे, घरकुलाचा दुसरा टप्पा पूर्ण व्हावा, घरकुलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यांसह इतर विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. दरम्यान, हैदराबाद येथील रोहित वमुला याच्यावर झालेल्या अन्यायाचा या वेळी निषेध करण्यात आला. यातील आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणीही करण्यात आली. (प्रतिनिधी)