जमिनीला भाव आल्याने उद्योगांना टाळे

By Admin | Updated: August 5, 2015 03:21 IST2015-08-05T03:21:41+5:302015-08-05T03:21:41+5:30

आपल्या फायद्यासाठी उद्योग बंद करून इतर ठिकाणी स्थलांतरित होण्याचा मार्ग उद्योजक पत्करत आहेत. शहरातील जमिनींना मोठा भाव मिळत असल्याने हा मार्ग निवडला जात आहे

Avoid industries due to land prices | जमिनीला भाव आल्याने उद्योगांना टाळे

जमिनीला भाव आल्याने उद्योगांना टाळे

मिलिंद कांबळे , पिंपरी
आपल्या फायद्यासाठी उद्योग बंद करून इतर ठिकाणी स्थलांतरित होण्याचा मार्ग उद्योजक पत्करत आहेत. शहरातील जमिनींना मोठा भाव मिळत असल्याने हा मार्ग निवडला जात आहे. बांधकाम व्यावसायिकांना जमीन विकून दुसऱ्या ठिकाणी
स्वस्तात जमीन मिळवून नव्याने उद्योग सुरू केले जातात.
इतरत्र कमी दरात जमीन आणि स्वस्तात कामगार मिळत असल्याने स्थलांतर वाढले आहे. त्याचबरोबर कामगारनेत्यांची अरेरावी, कामगारांशी संघर्ष, वेतनवाढीचा तगादा, कायदेशीर बाबींचा ताप, न्यायालयीन लढा, विजेचा प्रश्न आदी समस्या आणि अडचणींचा बाऊ करून स्थलांतरचा निर्णय घेतला जातो.
बेस्ट सिटीकडे वाटचाल होत असल्याने शहरात निवासी क्षेत्र वाढत आहे. पुणे शहरातील नागरिक पिंपरी-चिंचवडकडे वळत आहेत. त्यामुळे येथील जमिनींना सोन्यापेक्षा अधिक भाव आहे. तेथे निवासी आणि व्यापारी संकुल उभारून विक्री केल्यास आतापर्यंत केलेल्या उद्योग उलाढालीइतपत नफा प्राप्त होत असल्याचे चित्र आहे. या दुहेरी फायद्यामुळे स्थलांतराचे प्रमाण थांबण्याचे नाव घेत नाही. यामुळे शहरातील अनेक उद्योग बंद झाले आहेत.
टाळे लागल्याने काही उद्योगांच्या इमारती, शेड आणि यंत्रसामग्रीची पडझड झाली आहे. काही जागेत उंच, निवासी आणि व्यापारी संकुल, शॉपिंग मॉल, आयटी हब उभे राहिले आहेत. यंत्रांची धडधड बंद होऊन त्या ठिकाणी चकाचक उंचच उंच इमारती उभ्या राहत आहेत. व्यापारी कार्यालय, तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, शोरूम आदी व्यवसायासाठी त्यांचा वापर होऊ लागला आहे. काही ठिकाणी निवासी इमारती साकारल्या आहेत. त्यामुळे एमआयडीसीचे व्यापारीकरण आणि नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. या कारणामुळे एमआयडीसीचा मूळ हेतू बाजूला सारला जात आहे.
एकापाठोपाठ एक उद्योगधंदे बंद होत असल्याने कामच नसल्याने कामगारवर्गावर उपासमारीची वेळ येण्याचा धोका आहे. स्वयंचलित यंत्रसामग्रीमुळे कामगारांची संख्या पूर्वीच कमी झाली आहे. त्यात उद्योग बंद होत असल्याने कामगारांची मागणी घटत आहे.
व्यापारीकरणाचे हे प्रमाण असेच कायम राहिल्यास कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता आहे. भविष्यात उद्योगनगरीची ओळखच पुसली जाण्याचा धोका नाकारता येत नाही. व्यापारीकरण व नागरीकरणामुळे महापालिकेच्या महसुलावरही विपरीत परिणाम होणार आहे. औद्योगिक क्षेत्रातून प्राप्त होणाऱ्या महसुलाच्या आकडेवारीत कमालीची घट होणार आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडणार आहे. स्थलांतर केल्याने तेथे रोजगारनिर्मिती होते असे कारण उद्योजक देतात. मात्र, येथील जमीन शेतकऱ्यांनी रोजगार निर्मितीसाठीच दिली होती. मात्र, उद्योगच बंद करून रोजगारच संपविण्याचा हा डाव सुरू आहे. यात मूळ शेतकरी आणि स्थानिकांना रोजगारापासून डावलल्याची भावना वाढत आहे.

Web Title: Avoid industries due to land prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.