लष्कराच्या दस्तऐवजांचे आता होणार डिजिटायझेशन
By Admin | Updated: August 17, 2015 02:41 IST2015-08-17T02:41:31+5:302015-08-17T02:41:31+5:30
संरक्षण विभागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे देशातील दुसरे अर्काईव्हल युनिट अँड रीसर्च सेंटर (एयूआरसी) खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या परिसरात साकारत आहे

लष्कराच्या दस्तऐवजांचे आता होणार डिजिटायझेशन
सर्वजीत बागनाईक, खडकी
संरक्षण विभागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे देशातील दुसरे अर्काईव्हल युनिट अँड रीसर्च सेंटर (एयूआरसी) खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या परिसरात साकारत आहे. यामध्ये संरक्षण विभाग व कँटोन्मेंट बोर्डाच्या जमिनींसंदर्भातील महत्त्वपूर्ण दस्तऐवज डिजिटल व मायक्रो फिल्म्सच्या स्वरूपात ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर संशोधन व प्रशिक्षणाची व्यवस्थाही येथे होणार आहे.
संरक्षण विभागाच्या जमिनीबाबतची कागदपत्रे व अन्य महत्त्वपूर्ण गोष्टींची जपणूक यापूर्वी दिल्लीतील ‘एयूआरसी’द्वारे केली जात होती. त्याचप्रमाणे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयांतर्गत येणाऱ्या १९ कँटोन्मेंट व रक्षा संपदा विभागाशी संबंधित कागदपत्रे ठेवण्यासाठी खडकीमध्ये हे केंद्र सुरू होणार आहे. सेंट इग्नाशिअस चर्चच्या समोर होत असलेल्या या केंद्राच्या बांधकामास मे २०१३ मध्ये सुरुवात झाली. या केंद्रामध्ये अतिशय संवेदनशील दस्तऐवज, दुर्मिळ कागदपत्रे व मायक्रो फिल्म्स ठेवण्यात येणार आहेत. या ठिकाणी लष्कराच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था असेल. बांधकाम व अन्य सर्व खर्च हा दक्षिण मुख्यालयाकडूनच केला जात आहे.
केंद्राचे निम्म्याहून अधिक काम झाले असून, लवकरच ते पूर्ण होईल. या केंद्रासाठी खडकी कॅँटोन्मेंट बोर्डाचा परिसर निवडण्याचे कारण म्हणजे केंद्रासाठी आवश्यक जमीन बोर्डाकडे उपलब्ध होती. हे ठिकाण रहदारीपासून दूर आहे; तसेच येथे प्रशिक्षणार्थींना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. याबरोबर दक्षिण मुख्यालयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाण असल्याने खडकीची निवड केली आहे. दिल्ली व पुणे शहर हे वेगवेगळ्या भूकंपप्रवण क्षेत्रात येतात. त्यामुळे दिल्लीमध्ये जरी भूकंपामुळे ही कागदपत्रे नष्ट झाली, तरी खडकी केंद्रात ती सहज उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे संरक्षण विभागाला आवश्यकतेप्रसंगी ती उपलब्ध करून देण्याचा या केंद्राचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.