Pimpri Chinchwad: पोलिस आयुक्तांचा आणखी एक दणका; भोसरीतील जगताप टोळीवर 'मोक्का'

By नारायण बडगुजर | Published: April 2, 2024 03:27 PM2024-04-02T15:27:05+5:302024-04-02T15:28:08+5:30

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आणखी एक दणका देत भोसरी येथील जगताप टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई केली...

Another bump from Police Commissioner; Target Jagtap gang mcoca Bhosari | Pimpri Chinchwad: पोलिस आयुक्तांचा आणखी एक दणका; भोसरीतील जगताप टोळीवर 'मोक्का'

Pimpri Chinchwad: पोलिस आयुक्तांचा आणखी एक दणका; भोसरीतील जगताप टोळीवर 'मोक्का'

पिंपरी : लोकसभा निवडणूक भयमूक्त व पारदर्शक तसेच नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी सराईत गुन्हेगार व टोळ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यात पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आणखी एक दणका देत भोसरी येथील जगताप टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई केली.

टोळी प्रमुख आदर्श ऊर्फ कुक्या गोविंद जगताप (वय २२), सुनील राणोजी जावळे (२६, दोघेही रा. आदर्श नगर, मोशी), रोहित ऊर्फ कक्या ज्ञानेश्वर सोनवणे (१९, रा. भोसरी) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. भोसरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना जगताप टोळीच्या सदस्यांनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून गुन्हे केल्याचे समोर आले. टोळीतील संशयितांवर भोसरी, दिघी, वाकड, फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, हत्यार बाळगणे अशा प्रकारचे १३ गुन्हे दाखल आहेत.

संशयितांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव भोसरी पोलिसांनी पोलिस आयुक्त कार्यालय येथे सादर केला. त्यानंतर अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी ‘मोकां’तर्गत कारवाईचे आदेश दिले.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, उपायुक्त (परिमंडळ एक) स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त (गुन्हे १) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे, पोलिस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारीपासून तीन महिन्यांत आठ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण ३९ गुन्हेगारांवर ‘मोकां’तर्गत कारवाई केली. लोकसभा निवडणुकीसाठी पोलिसांनी व्यापक प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत सराईत गुन्हेगार व त्यांच्या टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाया होत आहेत.   

भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.

- नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी

Web Title: Another bump from Police Commissioner; Target Jagtap gang mcoca Bhosari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.