पिंपरी शहरातील २३४ शाळांत होणार फुटबॉलचे वाटप - विजय संतान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 02:47 IST2017-09-14T02:47:21+5:302017-09-14T02:47:47+5:30
राज्य सरकारच्या ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील २३४ शाळांसह पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकूण १६८९ शाळांमध्ये ३४७८ फुटबॉलचे वाटप करणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी मंगळवारी दिली.

पिंपरी शहरातील २३४ शाळांत होणार फुटबॉलचे वाटप - विजय संतान
पिंपरी : राज्य सरकारच्या ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील २३४ शाळांसह पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकूण १६८९ शाळांमध्ये ३४७८ फुटबॉलचे वाटप करणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी मंगळवारी दिली.
६ ते २८ आॅक्टोबर या काळात भारतात १७ वर्षांखालील मुलांची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंमध्ये खेळाची आवड निर्माण होवून अधिकाधिक खेळाडूंनी फुटबॉल खेळण्यासाठी प्रवृत्त व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने येत्या शुक्रवारी (दि. १५) आयोजित ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आशोजित पत्रकार परिषदेत संतान बोलत होते. यावेळी पुणे मनपाच्या सहायक उपायुक्त किशोरी शिंदे, पुणे मनपा शिक्षण विभाग क्रीडाप्रमुख राजेन्द्र ढूमणे, पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्रदीप परदेशी, शिक्षण अधिकारी (निरंतर) हरून आत्तार, अमित गायकवाड, पुणे मनपा शिक्षण अधिकारी भूषण बहिरामे, क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार उपस्थित होते.
या वेळी संतान म्हणाले, ‘‘खेळांच्या निमित्ताने मुलांना शारिरीक व्यायाम व त्याबरोबरीने पोषक आहार विषयी माहिती मिळाल्याने त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. खेळाची आवड निर्माण झालेल्या विद्यार्थी व्यसनाधीनतेकडे जाणार नाहीत. राज्यात शाळापातळीवर क्रीडा क्षेत्रात तज्ञ मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होईल. देशासाठी चांगले नागरिक निर्माण होतील. यादृष्टीने शासनाचा हा उपक्रम फायदेशीर ठरेल.’’
‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ हा उपक्रम उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये स्तरावर राबविण्यासाठी कार्यक्रम आखला आहे. त्याचा एक भाग म्हणून शुक्रवारी राज्याचा क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त्ताने पुण्यामध्ये सुमारे १६८९ शाळा, २०० कनिष्ठ महाविद्यालयांच्या बरोबरीने फुटबॉल संघटना, विविध फुटबॉल क्लब, एसआरपी ग्रुप, पुणे पोलीस, येरवडा जेल, रोटरी क्लब, लायन्स क्लब, क्रीडा मंडळे, युवक मंडळे अशा विविध ठिकाणी फुटबॉल खेळण्यात येणार आहे.
पुणे महापालिका क्षेत्रातील ४११ शाळांमध्ये ८५२ फुटबॉल, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात २३४ शाळांमध्ये ४७९, तर जिल्ह्यातील १,०४४ शाळांमध्ये २१४७ फुटबॉलचे वाटप करण्यात येणार आहे.