पिंपरी : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बुधवारी पिंपरी-चिंचवडमधील खासदार, आमदारांच्या घर आणि कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन केले.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी लक्ष वेधण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. मराठा क्रांती मुक मोर्चा महाराष्ट्र यांच्यावतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. मावळ, खेड लोकसभा मतदार संघ तसेच पिंपरी, चिंचवड, भोसरीतील आमदाराच्या निवासस्थानसमोर आंदोलन केले. सकाळी साडेदहाला प्राधिकरणातील भेळ चौकाजवळील राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी साबळे यांची कन्या वेणू साबळे आंदोलनकर्त्यांना भेटल्या. त्यानंतर अकराला थेरगावला येथील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना घरासमोर आंदोलन केले. विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बारणे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव विश्वजीत बारणे यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलकांनी घोषणाबाजी तसेच घंटानाद केला. बारणे संसदीय कामकाजानिमित्त दिल्लीत असल्याने त्यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला. मी नेहमीच सकल मराठा समाजाच्या बाजूने आहे. संसदेतसुद्धा मराठा समाजाची बाजू मांडली आहे, असे यावेळी सांगितले. त्यानंतर सकाळी साडेअकराला पिंपळेगुरव येथील भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरासमोर आंदोलन केले. जगताप आंदोलनात सहभागी झाले होते. जगताप म्हणाले, राजीनाम्याला घाबरणारा आमदार मी नाही. मात्र, राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपण विधानसभेत पाठपुरावा करणे गरजेचे आहे.सव्वाबाराला पिंपरीत आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या कार्यालसामोर आंदोलन केले. दुपारी साडेबाराला भोसरीतील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर दुपारी दीडीला भोसरी लांडगे आळीतील आमदार महेश लांडगे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही बरोबर आहोत, असे लांडगे म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत पिंपरी चिंचवडच्या खासदार, आमदारांनी केंद्र व राज्यात आवाज उठवून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात प्रकाश जाधव, मारूती भापकर, नकुल भोईर, धनाजी येळेकर, संतोष काळे, राजेंद्र देवकर, दत्ता शिंदे, प्रविण बनसोडे, प्रवीण पाटील, जीवन बोºहाडे आदी उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 19:50 IST
मराठा आरक्षणाबाबत पिंपरी चिंचवडच्या खासदार, आमदारांनी केंद्र व राज्यात आवाज उठवून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन
ठळक मुद्देमावळ, खेड लोकसभा मतदार संघ तसेच पिंपरी, चिंचवड, भोसरीतील आमदाराच्या निवासस्थानसमोर आंदोलनकेंद्र व राज्यात आवाज उठवून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची आंदोलकांची मागणी