Pimpri Chinchwad Crime | पोलीस ठाण्यात चल म्हणताच आरोपीने घेतला पोलीसाला चावा; पिंपळे सौदागरमधील घटना
By रोशन मोरे | Updated: March 25, 2023 15:53 IST2023-03-25T15:52:08+5:302023-03-25T15:53:03+5:30
ही घटना कोकणे चौक, पिंपळे सौदागर येथे दुपारी दीडच्या सुमारास घडली...

Pimpri Chinchwad Crime | पोलीस ठाण्यात चल म्हणताच आरोपीने घेतला पोलीसाला चावा; पिंपळे सौदागरमधील घटना
पिंपरी : एका गुन्ह्याच्या तपासासाठी फरार असलेल्या आरोपीला पोलीस ठाण्यात सोबत चल, असे पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, आरोपीने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना नखाने ओरखडत हातावर जोरात चावा घेतला. ही घटना शुक्रवारी (दि.२४) कोकणे चौक, पिंपळे सौदागर येथे दुपारी दीडच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलीस हवालदार संतोष मारुती बर्गे (वय ४४) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी खंडू जालिंदर लोंढे (वय २३, रा. रहाटणी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व पोलीस शिपाई खेडकर हे गस्त करती असताना गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी खंडू दिसला. फिर्यादी यांनी त्याला ओळखपत्र दाखवत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात चल असे सांगितले. मात्र, आरोपीने त्यास नकार देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना हाताने मारहाण करत नखाने ओरखडले. तसेच पोलिसांच्या हातावर चावा घेत ते करत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणला, असे फिर्यादीत नमूद आहे.