मैत्रिणीला कामावरून लवकर न सोडल्याने तरुणाचा राडा; बावधनमध्ये दुकानाच्या व्यवस्थापकाला बेदम मारहाण
By नारायण बडगुजर | Updated: May 20, 2024 18:27 IST2024-05-20T18:27:25+5:302024-05-20T18:27:57+5:30
पिंपरी : मैत्रिणीस कामावरून लवकर सोडत नाही, तिला सुट्टी देत नाही, असे बोलून तरुणाने दुकानाच्या व्यवस्थापकास बेदम मारहाण केली. ...

मैत्रिणीला कामावरून लवकर न सोडल्याने तरुणाचा राडा; बावधनमध्ये दुकानाच्या व्यवस्थापकाला बेदम मारहाण
पिंपरी : मैत्रिणीस कामावरून लवकर सोडत नाही, तिला सुट्टी देत नाही, असे बोलून तरुणाने दुकानाच्या व्यवस्थापकास बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. बावधन येथील शिंदेनगरमधील वामनहरी काॅम्प्लेक्स येथे गो कलर्स कपड्याच्या शाॅपच्या समोर शनिवारी (दि. १८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
अक्षय सुनीलराव सोळंखे (२८, रा. वारजे माळवाडी, पुणे, मूळगाव अमरावती) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. १९) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित अमय नागपुरे आणि त्याच्या मित्राच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय हे व्यवस्थापक असलेल्या दुकानात संशययित अमय याची मैत्रीण कामास आहे. अमय हा शनिवारी सायंकाळी गो कर्लस कपड्याच्या शाॅपच्या समोर आला. त्यावेळी तो त्याच्या मैत्रिणीस बोलावत होता.
दरम्यान दुकानात ग्राहक जास्त असल्याचे फिर्यादी अक्षय यांनी सांगितले. त्यामुळे अमय याला राग आला. तू माझ्या मैत्रिणीस लवकर का सोडत नाही, तिला तू सुट्टी देत नाही, असे अमय म्हणाला. त्यानंतर त्याने अक्षय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुला जिवे मारून टाकतो, असे बोलून शिवीगाळ केली. तसेच त्याच्या मित्रास बोलावून घेतले. त्याच्या मित्राने हातातील लोखंडी गोड कडे फिर्यादी अक्षय यांच्या डोक्यात व नाकाच्या वरील बाजूस मारून अक्षय यांना जखमी केले.