बनावट धनादेश देऊन नऊ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2016 01:12 IST2016-01-07T01:12:36+5:302016-01-07T01:12:36+5:30
कार्यालयाच्या बांधकामासाठीची ठरलेली रक्कम न देता एका बांधकाम व्यावसायिकाची नऊ लाखांची फसवणूक केल्याची घटना पिंपरी येथे घडली.

बनावट धनादेश देऊन नऊ लाखांची फसवणूक
पिंपरी : कार्यालयाच्या बांधकामासाठीची ठरलेली रक्कम न देता एका बांधकाम व्यावसायिकाची नऊ लाखांची फसवणूक केल्याची घटना पिंपरी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अकीब नत्रे खान (वय २६, रा. कामगारनगर, पिंपरी) यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांनी मनीष वर्मा (रा. गोरेगाव, मुंबई), संकेत (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) आणि मौलाअली गुलामरसुल मुल्ला (रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांच्याशी त्यांच्या कार्यालयाचे बांधकाम करण्यासंबंधी १० आॅक्टोबर २०१५ रोजी करार केला. करारनाम्यानुसार कार्यालयाचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासह या कामाचे १४ लाख २५ हजार रुपये इतकी रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार तिघे आरोपींनी सव्वादोन लाखांचा आगाऊ धनादेश १० आॅक्टोबरलाच दिल्याने अकीब खान यांनी त्या दिवशीच कार्यालयाच्या कामाला सुरुवात केली. दरम्यान, ११ डिसेंबरला ९० टक्के काम पूर्ण झाल्याने खान हे कामाचे पैसे मागण्यासाठी गेल्यावर त्यांना दोन धनादेश दिले. मात्र, ते वटले नाहीत. यासंबंधी त्यांनी आरोपींकडे विचारणा केल्यावर त्यांनी काम पूर्ण झाल्यावर पैसे देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार काम पूर्ण झाल्यानंतर एक लाखाचे चार धनादेश खान यांना दिले. मात्र, चारही धनादेश वटले नाहीत. यावर खान हे पैसे मागण्यासाठी पुन्हा आरोपींकडे गेले असता, त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, झालेल्या कामाचे पैसे न देता ९ लाख २५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनयभंग करणाऱ्यास अटक
पुणे : चाकूचा धाक दाखवून महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली. मुलीच्या आईने या संबंधी फिर्याद दाखल केली होती. आकाश गणेश झरक (वय १९, रा. गणेशनगर, साडेसत्तरानळी, हडपसर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. मागील १ वर्षापासून तो संबंधित मुलीला त्रास देत होता. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या महाविद्यालयीन तरुणास हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)