आळंदी : आळंदी नगर परिषद हद्दीत पिसाळलेला कुत्रा चावल्याने आळंदीतील लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एकूण ५१ जणांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती आळंदी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली.आळंदी येथील घाणीचे साम्राज्य असलेल्या भागीरथी नाला परिसरात ये-जा करताना गेल्या दोन दिवसांत पिसाळलेला कुत्रा चावल्याने अनेक जण जखमी झाले होते. जखमींमध्ये दोन लहान मुले व आठ महिला, तर ३१ पुरुषांचा समावेश आहे. अखेर आळंदी नगर परिषद प्रशासनास कळवण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड पशुवैद्यकीय विभागाच्या लोखंडी पिंजऱ्याच्या गाडीत कुत्र्यास जेरबंद करून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले, असे आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.आळंदी शहरात विविध ठिकाणी झालेल्या कुत्रा चावण्याच्या घटनेत दोन दिवसांत एकूण ५१ जण जखमी झाले. यामुळे परिसरात नागरिकांसह भाविकांत संतापाची लाट पसरली. आळंदीतील मोकाट कुत्र्यांबाबत नाराजी पसरली आहे. प्रकरणी भाविक, नागरिकांची सुरक्षितता जोपासण्यासाठी सार्वजनिक रस्त्यावर व जागांवर मोठ्या प्रमाणात भटकणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी विविध सेवाभावी संस्थांनी, तसेच आळंदी शहर भाजपचे संघटन सरचिटणीस भागवत काटकर यांनी केली आहे.आळंदीतील सार्वजनिक मोकळ्या जागा, रस्ते, इंद्रायणी नदी घाट, मरकळ रस्ता, चावडी चौक, वडगाव रस्ता, भैरवनाथ चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री फिरत असतात. यामुळे दिवसा, रात्री-अपरात्री मोकाट कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जातात. वडगाव चौक, चावडी चौक, मंदिर परिसर, मरकळ रस्ता, शाळांच्या परिसरात फिरत असलेली मोकाट कुत्री यामुळे शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, प्रवासी, वारकरी, भाविक यांना रहदारीला गैरसोयीचे व भीतीदायक होत आहे. अनेकांना यामुळे यापूर्वीही दुखापती झाल्या आहेत.आंदोलनाचा दिला इशाराभाविक व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आळंदी नगर परिषदेने शहरातील मोकाट कुत्र्यांना अँटी रेबीज इंजेक्शन देण्याची गरज आहे. मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना रहदारीला त्रासदायक होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी करण्यात येत आहे. आळंदीतील नागरिकांकडे वैयक्तिक मालकीचे कुत्रे असतील, त्यांच्या गळ्यात पट्टे आणि त्यांच्यापासून नागरिकांना, शेजाऱ्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना नगर परिषदेने द्याव्यात. तसेच, खासगी कुत्र्यांची अभिलेखात नोंद नसल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भाविक, नागरिक तसेच शालेय मुले यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन तत्काळ उपाययोजना न केल्यास या मागणीसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आळंदीत पिसाळलेल्या कुत्र्याचा ५१ जणांना चावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:13 IST