पिंपरी : महापालिकेच्या हद्दीतील एक झाड तोडण्यास परवानगी देताना अनामत रकमेसह नव्याने पाच झाडांची लागवड व संवर्धन सक्तीचे करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, वृक्ष समितीने २२ कोटी ६१ लाखांच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली आहे.महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी समितीच्या सदस्यांची बैठक झाली. या वेळी प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, प्राधिकरण समितीचे सदस्य शीतल शिंदे, नवनाथ जगताप, श्याम लांडे, विलास मडेगिरी, तुषार कामठे, मुख्य उद्यान अधिकारी सुरेश साळुंखे, उद्यान अधीक्षक दत्तात्रय गायकवाड, वृक्षसंवर्धन अधीक्षक प्रकाश गायकवाड उपस्थितीत होते.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आवश्यकतेनुसार नागरिकांना वृक्ष प्राधिकरण समितीतर्फे झाडे तोडण्यास परवानगी देण्यात येत होती. मात्र, त्या विषयीचे ठोस धोरण महापालिकेकडे नव्हते. त्यामुळे समितीच्या बैठकीत नव्याने धोरण ठरविण्यात आले. यामध्ये झाड तोडण्यास परवानगी देण्यापूर्वी एका झाडासाठी दोन हजार रुपये अनामत रक्कम घेतली जाणार आहे. तसेच, झाड तोडणाºयांकडून किमान पाच झाडांची लागवड करून त्यांचे तीन वर्षांसाठी संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तीन वर्षांत संबंधिताने पाच झाडे न जगविल्यास त्याने दिलेली अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माहितीला डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दुजोरा दिला.
एक तोडल्यास ५ झाडांचे संवर्धन, वृक्ष प्राधिकरण समितीचा निर्णय, २२ कोटी ६१ लाखांचे अंदाजपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 03:28 IST