एका दिवसात ४२ टन निर्माल्य

By Admin | Updated: September 29, 2015 02:10 IST2015-09-29T02:10:13+5:302015-09-29T02:10:13+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील विसर्जन घाटांवर ठेवण्यात आलेल्या ४२ निर्माल्यकुंडांत गणेशोत्सवादरम्यान १२० टन निर्माल्य जमा झाले.

42 tons Nirmalya in one day | एका दिवसात ४२ टन निर्माल्य

एका दिवसात ४२ टन निर्माल्य

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विसर्जन घाटांवर ठेवण्यात आलेल्या ४२ निर्माल्यकुंडांत गणेशोत्सवादरम्यान १२० टन निर्माल्य जमा झाले. यामध्ये अनंत चतुर्दशीला रविवारी एका दिवसात तब्बल ४२ टन निर्माल्य जमा झाले आहे.
गणरायाची पूजा करताना दहा दिवसांत दुर्वा, हार, फुले गणरायाला वाहिली जातात. तसेच दहा दिवसांनंतर हे निर्माल्य नदीत विसर्जित केले जाते. भाविकांनी हे निर्माल्य नदीपात्रात न टाकता निर्माल्य कुंडात जमा करावे, असे आवाहन महापालिकेकडून विसर्जन घाटावर केले जात होते. यासाठी एकूण ४२ कुंड ठेवण्यात आले होते. त्यानुसार अनेक भाविकांनी निर्माल्य नदीत न सोडता कुंडात जमा केले. सर्वाधिक निर्माल्य थेरगाव घाट आणि पिंपरीतील रिव्हररोड येथील घाटांवर जमा झाले. कुंडात निर्माल्य जमा करावे, याबाबतचे आवाहन करण्यासाठी प्रत्येक घाटावर आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि स्वयंसेवक होते. गणपती विसर्जनासाठी घाटावर येणाऱ्या प्रत्येकाला आवाहन केले जात होते. निर्माल्य जमा करणे, घाट स्वच्छ ठेवणे, भाविकांना मदत करणे यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाचे २१७ कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी ३८ यासह ६८५ स्वयंसेवक तैनात होते.
जमा झालेल्या निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जाणार असल्याचे, आरोग्य कार्यकारी अधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 42 tons Nirmalya in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.