पिंपरी चिंचवडमध्ये आगीच्या २ घटना; तेलकट पदार्थामुळे घसरली वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:48 IST2018-02-06T13:45:41+5:302018-02-06T13:48:07+5:30
चिंचवड, मोहननगरजवळील मिल्कमेड पारस न्यूट्रिमेंट प्रा. लिमिटेड या बेकरी उत्पादन करणाऱ्या कारखान्याला मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

पिंपरी चिंचवडमध्ये आगीच्या २ घटना; तेलकट पदार्थामुळे घसरली वाहने
पिंपरी : चिंचवड, मोहननगरजवळील मिल्कमेड पारस न्यूट्रिमेंट प्रा. लिमिटेड या बेकरी उत्पादन करणाऱ्या कारखान्याला मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. कारखान्यातील साहित्य मात्र जळुन खाक झाले. रस्त्यावर चिकट, तेलकट पदार्थ पसरल्याने वाहने घसरू लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन त्या ठिकाणी पाण्याचा फवारा मारला. दुसरी आगीची घटना त्याच परिसरातील काळभोरनगर जवळ घडली. अन्सारी वजन काटा या शेडचे आगीत नुकसान झाले.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची तीन वाहने घटनास्थळी दाखल झाली. काही वेळातच आग नियंत्रणात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग विझविताना मारलेल्या पाण्याच्या फवाऱ्यामुळे बेकरीत वापरले जाणारे तेलकट पदार्थ रस्त्यावर वाहून आले होते. या तेलकट पदार्थावरून घसरून पाच ते सहा दुचाकीस्वार घसरून पडले. कोणालाही इजा झाली नाही.
काळभोरनगर येथे अन्सारी वजन काटा या दुकानाला सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. घटनास्थळावर अग्निशामक विभागाचे तीन बंब दाखल झाले असून आग आटोक्यात आणली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.