पिता-पुत्राकडून ४० जणांना एक कोटी १२ लाखांचा गंडा, पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रकार

By नारायण बडगुजर | Published: May 6, 2024 08:42 PM2024-05-06T20:42:56+5:302024-05-06T20:43:50+5:30

डी मॅट अकाउंट तयार न करता त्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली...

1 Crore 12 Lakh Ganda from father-son to 40 people, type in Pimpri-Chinchwad area | पिता-पुत्राकडून ४० जणांना एक कोटी १२ लाखांचा गंडा, पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रकार

पिता-पुत्राकडून ४० जणांना एक कोटी १२ लाखांचा गंडा, पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रकार

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डी मॅट अकाउंट काढले असल्याचे सांगत ४० जणांकडून गुंतवणूक म्हणून एक कोटी १२ लाख २८ हजार रुपये घेतले. मात्र, डी मॅट अकाउंट तयार न करता त्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली. चिखली येथे पूर्णानगरमध्ये २०१५ ते ५ मे २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.

प्रशांत सीताराम खाडे आणि त्याचे वडील सीताराम खाडे (रा. खटाव, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. सुहास बजरंग शेजवळ (वय ५६, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ५) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाडे पिता-पुत्रांनी आपसात संगनमत करून फिर्यादी सुहास शेजवळ आणि त्यांचे सहकारी मित्र नवनाथ तानाजी दळवी, संजय शंकर शेकडे आणि इतर ३७ जणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. ‘आम्ही तुमचे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी डी मॅट अकाउंट काढले आहे’, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी सुहास यांच्याकडून १० लाख ३८ हजार रुपये तर इतर ३९ जणांकडून एक कोटी एक लाख ९० हजार रुपये असे एकूण एक कोटी १२ लाख २८ हजार रुपये रोख आणि धनादेशाद्वारे घेतले. 

सुरुवातीला फिर्यादी आणि इतर लोकांना काही दिवस परतावा मिळाला. मात्र त्यांनतर मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यानंतर खाडे पिता-पुत्राने परतावा देणे बंद केले. तसेच फिर्यादी सुहास आणि इतर ३९ जणांना एलकेपी कंपनीचे खोटे प्रमाणपत्र देत फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक महेश मुळीक तपास करीत आहेत.

Web Title: 1 Crore 12 Lakh Ganda from father-son to 40 people, type in Pimpri-Chinchwad area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.