चौकच्या धारावी किल्ल्यावर उभारण्यात आला शूरवीर चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा; जाणून घ्या, किल्ल्याचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 08:18 PM2021-08-18T20:18:49+5:302021-08-18T20:22:53+5:30

Chimaji Appa : १७३९ साली चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने पोर्तुगिजांचा पराभव करून वसई किल्ल्यासह धारावी बेट व परिसर काबीज करत मराठा साम्राज्याचा झेंडा फडकवला होता.

मीरा रोड - भाईंदरमधील चौक येथील धारावी किल्ल्यावर शूरवीर चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा मंगळवारी रात्रीच्या सुमारास बसविण्यात आला. गेली अनेक वर्षे चिमाजी अप्पा यांचे स्मारक विकसित करण्याचे काम रखडले होते. १७३९ साली चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने पोर्तुगिजांचा पराभव करून वसई किल्ल्यासह धारावी बेट व परिसर काबीज करत मराठा साम्राज्याचा झेंडा फडकवला होता. २ वर्षाच्या लढ्यानंतर हा विजय त्यांनी मिळवला होता. (Equestrian statue of Chimaji Appa at Chowk Dharavi fort)

चिमाजी अप्पा यांनी १९३७ सालीही चौक काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. वसई किल्ल्या समोर समुद्र व खाडीच्या संगमावर असलेल्या चौकच्या डोंगरावर त्यावेळी पोर्तुगीजांनी धारावी किल्ला बांधण्यास घेतला होता. परंतु किल्ल्याचे काम अर्धवट राहिले होते. गेल्या काही वर्षात ह्या किल्ल्याच्या तटबंदी व अंतर्गत भिंती आदी काही प्रमाणात नष्ट करण्यात येत असल्याचे प्रकार सांगितले जात होते.

मीरा भाईंदर नगरपरिषद असताना सदर डोंगरावर चिमाजी अप्पा यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शहराच्या विकास आराखड्यातदेखील स्मारकासाठी सुमारे २५०० मीटर जागा आरक्षित करण्यात आली होती. तत्कालीन नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी सदर किल्ल्याची भिंत तोडली जात असल्या प्रकरणी तक्रार केल्यावर स्मारकाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. २००४ साली महासभेत नगरसेवक मिलन म्हात्रे आदींनी स्मारक विकसित करून चिमाजी अप्पा यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात पुढाकार घेतला होता.

गेली १८ वर्षे विविध परवानग्या आणि मंजुऱ्यांच्या फेऱ्यात पुतळा व स्मारकाचे काम रखडले होते. नुकतीच अंतिम परवानगी मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा चौकच्या डोंगरावर स्थानापन्न करण्यात आला. यावेळी आजी - माजी नगरसेवकांसह स्थानिक मच्छीमार तसेच इतिहास प्रेमींनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोठा आनंद व्यक्त केला. आमदार गीता जैन यांनी १५ लाखांचा निधी सुशोभीकरणच्या कामासाठी उपलब्ध करून दिला आहे.

चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा आणि त्यांचे स्मारक मुळे धारावी बेट परिसर तसेच शहराचा ऐतिहासिक वारसा उजळून निघणार आहे असे स्थानिक नगरसेविका हेलन जॉर्जि गोविंद यांनी सांगितले. दीपक खांबीत ( कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग ) - चिमाजी अप्पा यांच्या पुतळ्यासाठी २१ लाखांचा खर्च आला आहे. याठिकाणी स्मारक विकसित करण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी २५ लाखांचा खासदार निधी दिला आहे. लवकरच आवश्यक मंजुऱ्या घेऊन सुशोभीकरणचे काम सुरू केले जाईल.