भारीच! आता घरबसल्या मिळेल आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, Voter ID; जाणून घ्या, कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 03:20 PM2022-08-30T15:20:37+5:302022-08-30T15:37:01+5:30

Aadhaar Card, Voter ID, PAN Card, Driving Licence : डिजिटल इंडियाच्या काळात लोकांची महत्त्वाच्या कागदपत्रांची मुख्य कामे आता घरी बसून केली जातात.

डिजिटल इंडियाच्या काळात लोकांची महत्त्वाच्या कागदपत्रांची मुख्य कामे आता घरी बसून केली जातात. लोकांना रेशनकार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी वारंवार सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही. कारण त्यांची बहुतांश कामे ऑनलाइनही करता येणार आहेत.

कागदपत्रे केवळ व्यक्तीच्या ओळखीसाठीच नव्हे तर सरकारी सुविधा आणि खासगी लाभांसाठीही अत्यंत उपयुक्त आहेत. तुम्हाला जर यापैकी कोणतंही कागदपत्र बनवायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या पद्धतींच्या मदतीने ते अत्यंत कमी वेळात करू शकता. नेमकं कसं ते जाणून घेऊया...

सर्वप्रथम तुमच्या आजुबाजूच्या भागात आधार नोंदणी केंद्र शोधा. आधार केंद्रासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करा. ही अपॉइंटमेंट आधारच्या अधिकृत वेबसाईटवर बुक केली जाऊ शकते. याशिवाय अपॉइंटमेंट न घेताही आधार केंद्राला भेट देता येईल. मतदार ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि जन्म प्रमाणपत्र यासारखी महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा. नावनोंदणी केंद्राला भेट दिल्यानंतर, तुमचा तपशील नावनोंदणी फॉर्ममध्ये भरा.

सर्व आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करा. यानंतर युजर्सना एक पावती मिळेल ज्यामध्ये 14 अंकी नोंदणी क्रमांक असेल. याद्वारे आधार कार्डचे स्टेटस जाणून घेता येईल. व्हेरिफिकेशननंतर आधार कार्ड दिलेल्या पत्त्यावर पोस्ट केले जाते. आधार कार्ड मिळण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

जर युजर्सचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि त्याला परवान्यासाठी अर्ज करायचा असेल तर ही प्रक्रिया घरी बसून करता येईल. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी https://parivahan।gov।in/sarathiservice/newLLDet।do वर जा आणि फॉर्म डाउनलोड करा आणि प्रिंट करा. आता तुम्हाला Apply Online DL च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

फॉर्ममध्ये तुमची सर्व माहिती भरा. यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. यानंतर युजरला ड्रायव्हिंग टेस्टसाठी स्लॉट मिळेल. एकदा चाचणी उत्तीर्ण झाल्यावर, युजरला 2 किंवा 3 आठवड्यांत ड्रायव्हिंग लायसन्स मिळते.

मतदार ओळखपत्रासाठी वय 18 वर्षांच्या वर असायला हवं. नोंदणीसाठी https://www.nvsp.in/ या वेबसाइटला भेट देऊ शकता. नंतर सामान्य मतदारांना फॉर्म 6 भरावा लागेल. हाच फॉर्म प्रथमच मतदार आणि इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या मतदारांसाठी देखील वापरला जातो. NRI मतदारांना फॉर्म 6A भरावा लागेल.

कोणत्याही युजरला त्याचे नाव, फोटो, वय, एपिक क्रमांक, जन्मतारीख, पत्ता, नातेवाईकाचे नाव, नातेसंबंधाचा प्रकार किंवा लिंग बदलायचे असेल तर त्याला फॉर्म 8 भरावा लागेल. याशिवाय, जर एखाद्या युजरला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचे असेल, तर त्यासाठी फॉर्म 8A भरावा लागेल.

नव्या पॅन कार्डसाठी NSDL वेबसाईटला भेट द्या आणि ऑनलाईन पॅन अर्ज विभागात जा. त्यानंतर तुमचा अर्ज प्रकार निवडा. यामध्ये भारतीय नागरिकांसाठी फॉर्म 49A, गैर-भारतीय नागरिकांसाठी 49AA किंवा पॅन कार्डच्या Reprint बदलाचा पर्याय निवडता येईल. युजरला श्रेणी निवडावी लागेल. यानंतर, युजरला नाव आणि जन्मतारीख निवडावी लागेल.

पुढील पेजवर युजरला एक स्लिप आणि टोकन क्रमांक दिला जाईल. तुम्हाला पॅन एप्लिकेशन फॉर्मसह सुरू ठेवा वर क्लिक करावे लागेल. यानंतर अधिक वैयक्तिक माहिती भरावी लागेल. सर्व वैयक्तिक तपशील पुन्हा तपासल्यानंतर, पुढे जा पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर पेमेंट पर्याय दिसेल. यानंतर डिमांड ड्राफ्ट किंवा बिल डेस्कद्वारे ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडा. यानंतर ते घरी पाठवलं जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.