Hi! सरकारची भन्नाट सेवा; व्हॉट्सअ‍ॅपवरच डाऊनलोड करा आधार, पॅन आणि अन्य कागदपत्रे...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 05:03 PM2022-10-06T17:03:51+5:302022-10-06T17:10:10+5:30

एक ना धड भाराभर अ‍ॅप झाल्याने कोणत्या अ‍ॅपमध्ये काय ठेवायचे, त्यांची नावे आदी लक्षात ठेवणे खूप कठीण बनत चालले आहे. शिवाय आयत्यावेळी ते सापडेलच असे नाही. यातून सुटका कशी करायची...

आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. प्रत्येकजण आता खिशात नाही तर मोबाईलमध्ये फोटो काढून आधार कार्ड, पॅनकार्ड, लायसन आदी ठेवतात. आता तर प्रत्येकाची अॅपही आहेत. शिवाय सरकारचे डिजीलॉकर हे अॅपदेखील आहे. परंतू, होते काय ना एक ना धड भाराभर अॅप झाल्याने कोणत्या अॅपमध्ये काय ठेवायचे, त्यांची नावे आदी लक्षात ठेवणे खूप कठीण बनत चालले आहे. शिवाय आयत्यावेळी ते सापडेलच असे नाही. यातून सुटका कशी करायची...

तर व्हॉट्सअॅपवर तुम्हाला मागितल्या मागितल्या आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन आदी कागदपत्रे मिळणार आहेत. सरकारनेच तशी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे काळजी करू नका, तुमच्या कागदपत्रांचे संरक्षणही होणार आहे. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवर ही कागदपत्रे कशी डाऊनलोड करायची याची प्रक्रिया सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही काही क्षणांत कायगपत्रे डाऊनलोड करू शकता.

सरकारने यासाठी MY Govt Helpdesk WhatsApp Chatbot लाँच केला आहे. हा काय आहे, तर एक रोबोटच. याचा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागणार आहे. यासाठी आणखी एक काम करावे लागणार आहे, ते म्हणजे तुम्हाला डिजीलॉकरवर आधी तुमची सर्व डॉक्युमेंट अपलोड करावी लागणार आहेत. डिजिलॉकरला जो मोबाईल नंबर द्याल तोच नंबर व्हॉट्सअॅपला वापरावा लागणार आहे.

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला MY Govt Helpdesk चा 9013151515 हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. हा नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करून तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा. जसे तुम्ही मित्र, मैत्रिणीचा मोबाईल नंबर सेव्ह केल्यावर करता अगदी तसेच.

यानंतर My Govt Helpdesk चे चॅटबोट ओपन करा आणि Hi चा मेसेज पाठवा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला Covin किंवा DigiLocker यापैकी एक निवडण्यास सांगितले जाईल. येथे तुम्हाला DigiLocker चा पर्याय निवडावा लागेल. ही प्रक्रिया केल्यानंतर, होय पर्याय निवडा.

आता चॅटबॉट तुम्हाला डिजीलॉकर खात्याबद्दल विचारेल. यानंतर, तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक DigiLocker खात्याशी लिंक करून व्हॅलिडेशन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक OTP मिळेल. तो टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर होईल. आता DigiLocker खात्याशी लिंक केलेले डॉक्युमेंट चॅटबॉट लिस्टमध्ये दिसेल. हे डॉक्युमेंट तुम्ही आरामात पीडीएफमध्ये डाऊनलोड करू शकता. ते इतरांना फॉरवर्डही करू शकता.