...तर चेहरा अन् आवाजच तुमची विश्वासार्हता सांगणार; फेल झाल्यास कर्ज नाही मिळणार

By कुणाल गवाणकर | Published: January 20, 2021 03:54 PM2021-01-20T15:54:55+5:302021-01-20T15:59:04+5:30

अरे तो चेहऱ्यावरूनच साधा वाटतो. मला तर तो चेहऱ्यावरूनच लबाड दिसतो, अशी वाक्यं तुम्ही ऐकली असतील. काही जण चेहऱ्यावरून माणसाच्या स्वभावाबद्दल, त्याच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल अंदाज बांधतात. काहींचे अंदाज बरोबर येतात. काहींचे चुकतात.

एखादी बँक कर्ज देताना चेहरा पाहत नाही. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच कर्ज मिळतं. कागदपत्रं अपुरी किंवा चुकीची असतील तर मग संबंधित व्यक्तीला कर्ज मिळत नाही.

जपानची राजधानी टोकियोमधील Deepscore AI कंपनीनं एक ऍप तयार केलं आहे. कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये कंपनीनं हे ऍप लॉन्च केलं.

या ऍपमध्ये असलेल्या अल्गोरिदमच्या मदतीनं फेशियल आणि व्हॉईज रेकग्निशनच्या मदतीनं एखादी व्यक्ती किती विश्वासार्ह आहे, याची माहिती मिळत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

आपण तयार केलेल्या ऍपचा वापर भविष्यात कर्ज पुरवठा क्षेत्रातील कंपन्या, बँका, विमा कंपन्या करतील, असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे.

कंपनीनं आपल्या ऍपचं वर्णन ‘नेक्स्ट जेनरेशन स्कोरिंग इंजिन’ असं केलं आहे. यामुळे अवघ्या दोन मिनिटांत लोन मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

Deepscore AI कंपनीनं तयार केलेलं ऍप आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं काम करतं. एखाद्या व्यक्तीचा चेहरा आणि त्याचा आवाज यांच्या माध्यमातून हे ऍप true score मोजतं.

या ऍपच्या मदतीनं भविष्यात कंपन्या कर्ज देण्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतील. सध्याच्या घडीला ऍप ७० टक्के योग्य तपशील देत असल्याची माहिती कंपनीनं दिली.

आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या माध्यमातून व्यक्तीच्या विश्वासार्हता मोजणाऱ्या ऍपबद्दल काही शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली. काही व्यक्तींच्या चेहऱ्यावर अगदी सहजपणे चिंता, काळजी, भीती असे भाव दिसतात. ते अतिशय नैसर्गिक असतात. मात्र नव्या तंत्रज्ञानामुळे त्यांना कर्ज मिळण्यात अडथळे येतील, असं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं.

माणसाच्या शरीरात असलेल्या काही गोष्टी तंत्रज्ञानाला समजत नाही. त्याचे दुष्परिणाम काही व्यक्तींना सहन करावे लागू शकतात, अशी चिंता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.