By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 14:54 IST
1 / 10शिवसेनेतील बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आले, यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान तसेच शहरातील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक घेतली. 2 / 10या बैठकीत शिंदेंनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच, पूरपरिस्थिती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं सांगितलं. तसेच, लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल,असेही ते म्हणाले. 3 / 10तत्पूर्वी शिंदे यांनी नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, यवतमाळ या शहरांना भेटी देत तेथील कार्यकर्त्यांना संबोधित केले. शिंदे यांनी आपल्या भाषणात बंडखोरी करण्याची वेळ का आली हे सांगितला. 4 / 10आपल्या भाषणात हे सरकार शिवसेनेचंच असून युती सरकारला महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचंही ते सातत्याने सांगत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या मालेगाव येथील सभेत विमानातील एक किस्सा सांगितला होता. 5 / 10सध्या, त्या किस्स्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदेंनी फोन लावण्यासाठी थेट विमान थांबवल्याचं सांगितलं होतं. यावरुन, सोशल मीडियात त्यांना ट्रोल केलं जात आहे. तसेच, फोन लावला तेव्हा त्यांच विमान हवेत होतं की जमिनीवर असाही प्रश्न विचारला जात आहे. 6 / 10स्वत: एकनाथ शिंदेंनी आता या व्हिडिओबद्दल विचारले असता स्पष्टीकरण दिलं आहे. दादा भुसेंच्या संबंधातील एक रुग्ण लिलावती रुग्णालयात उपचार घेत होता, त्यासाठी मी फोन केला होता. त्यावेळी, पायलटला विमान थांबविण्याचं सांगितलं होतं, असे स्पष्टीकरण शिंदेंनी दिलं. 7 / 10तसेच, पाटण्यातील एका मराठी कुटुंबाला मुंबईला आणण्यासाठीही मी फोन केला होता. पाटण्यात सिलेंडरस्फोटात 2 मुले जखमी झाली होती. हे तातडीने फोन करायचे होते म्हणून मी विमान थांबवले होते, मला उशीर झाला म्हणून नव्हतं थांबवलं, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलं. 8 / 10दरम्यान, मुंबईतील लीलावती रुग्णालयात शिंदेंच्या परिचयातील व्यक्तीवर उपचार सुरू होते. मात्र, त्या व्यक्तीचा कुठलातरी रिपोर्ट मिळण्यास काहीही विलंब होत होता, यासंदर्भातील किस्सा शिंदेंनी एका सभेत जाहीरपणे सांगितला होता. 9 / 10'मी विमानात बसलो होतो, लीलावतीमधील त्या अधिकाऱ्याला फोन लागत नव्हता, म्हणजे बिझी लागत होता. मग, मी पायलटला सांगितलं थांब, 5 मिनिटं थांब मला महत्त्वाचा फोन लावायचा आहे. 10 / 10त्यावेळी, पायलटने विमान थांबवलं 10 मिनिटं. माझी चर्चा झाली, आणि दादांना त्यांचा रिपोर्ट आला. वेळेवर फोन गेला नाही तर उपयोग काय त्याचा,' असे म्हणत एकनाथ शिंदेंनी विमानातून डॉक्टरांना फोन केल्याचा किस्सा भरसभेत सांगितला होता. त्यावर, आता स्पष्टीकरण दिलं आहे.