शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बदामाचं रोप तयार करुन बागेत लावण्याची पाहा सोपी पद्धत, झाड वाढेल जाेमानं आणि फळंही येतील सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2026 17:44 IST

1 / 10
बदाम खाण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहीतच आहेत, पण याच बदामाचं रोप देखील आपण लावू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? अनेकदा आपल्याला वाटतं की बदामाचं रोप फक्त थंड हवेच्या ठिकाणीच येतं, पण योग्य काळजी आणि योग्य पद्धत वापरली तर आपण घरच्याघरीच बदामाचं रोप छान वाढवू शकतो.
2 / 10
घरच्याघरीच झाडं लावण्याची आवड आपल्यापैकी अनेकांना असते, पण काहींना वाटतं की बदामासारखं झाड लावणं खूप अवघड आहे. परंतु, प्रत्यक्षात थोडी काळजी आणि योग्य पद्धत वापरली तर तुम्ही घरच्याघरीच बदामाचं रोप अगदी सहज लावू शकता. बदाम हे केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नसून त्याचं झाडही तुमच्या घराच्या बागेला एक वेगळं सौंदर्य देऊ शकतं. योग्य बी निवडणं, रोप लावण्याची पद्धत आणि त्याची निगा राखणं या काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हीही घरी बदामाचं झाड वाढवू शकता.
3 / 10
बदामाचं रोप लावण्यासाठी नेहमी कच्चे आणि न भाजलेले तसेच वरुन टोकदार असलेलेच बदाम निवडा. शक्य असल्यास टणक कवच असलेले बदाम वापरा, कारण ते रुजण्याची शक्यता अधिक जास्त असते.
4 / 10
निवडलेले बदाम किमान २४ ते ४८ तास कोमट पाण्यात भिजत ठेवा. यामुळे बदामाचे बाहेरील कवच मऊ होते आणि अंकुर फुटण्यास मदत होते.
5 / 10
दुसऱ्या दिवशी या पाण्यांत भिजवलेल्या बदामाच्या साली अलगद काढून बदाम एका पेपर टॉवेलमध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवावेत. पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपरमध्ये बदाम गुंडाळून ठेवल्यानंतर तो टिश्यू पेपर किंचित पाण्याने ओला करुन भिजवून घ्यावा. त्यानंतर हा ओला टिश्यू पेपर एका प्लास्टिकच्या हवाबंद डब्यांत भरून झाकण लावून घ्या. हा डबा थंड, गडद जागी (किंवा फ्रिजच्या खालच्या कप्प्यात) ४ ते ५ दिवस ठेवा.
6 / 10
साधारणतः ४ ते ५ दिवसांत या बदामाला अंकुर फुटलेले दिसतील. जेव्हा हे अंकुर अर्धा ते एक इंच लांब होतील, तेव्हा ते जमिनीत लावण्यासाठी तयार आहेत असे समजावे.
7 / 10
एका मध्यम आकाराच्या कुंडीत पाण्याचा निचरा होण्यासाठी खाली छिद्र ठेवा. माती तयार करताना त्यात ५०% बागेतील माती, ३०% सेंद्रिय खत (कंपोस्ट) आणि २०% वाळू मिसळा.
8 / 10
अंकुर फुटलेला भाग वर राहील अशा पद्धतीने बदाम मातीत १ ते २ इंच खोल मातीत लावा. वरून हलकेच माती टाका आणि थोडे पाणी शिंपडा. कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे सकाळचे कोवळे व हलके ऊन मिळेल. रोपाला प्रखर उन्हापासून दूर ठेवा.
9 / 10
मातीतील ओलावा टिकवून ठेवा पण अतिपाणी टाळा. दर १५ दिवसांनी गांडूळ खत किंवा घरगुती शेणखत द्या. साधारण १ ते २ वर्षात तुमचे छोटे रोप एका छान झाडात रूपांतरित होईल.
10 / 10
साधारणपणे ठराविक वर्षानंतर रोपाला सुंदर गुलाबी-पांढरी फुले येतात. या फुलांचे रूपांतर पुढे बदामाच्या फळात होते. जर तुम्ही बियाण्यापासून रोप लावले असेल, तर त्याला बदाम येण्यासाठी साधारणपणे ३ ते ५ वर्षे लागू शकतात. जर तुम्ही नर्सरीतून 'कलमी' केलेले रोप आणले असेल, तर त्याला २ ते ३ वर्षांतच बदाम लागण्यास सुरुवात होते. रोप जेव्हा ५ ते ७ वर्षांचे होते, तेव्हा त्याला भरपूर प्रमाणांत बदाम येऊ शकतात.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सPlantsइनडोअर प्लाण्ट्सWaterपाणी